रत्नागिरी, 8 सप्टेंबर : राज्यभरात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह आहे. या उत्साहदरम्यान महाराष्ट्रातील राजकारण थंड होईल, अशी अपेक्षा होती. पण तसं घडताना दिसत नाहीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सेना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत. कारण भाजपकडून शिवसेनेचे आक्रमक नेते भास्कर जाधव यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या विरोधात गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राज्यात हिंदू-मुस्लिम यांच्यात दंगल पेटवेल, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यवर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे. भास्कर जाधव यांच्या वक्तव्यानंतर गुहागरमधील भाजपने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. भास्कर जाधव यांचे वक्तव्य निराधार आणि सामाजिक सलोखा बिघडवणारे असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी गुहागर पोलिसात लेखी तक्रार केली आहे. ( शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांच्यावर 500 कोटी घोटाळ्यांचा सोमय्यांचा आरोप ) भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले होते? आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भास्कर जाधव यांनी थेट भाजपला लक्ष्य केलं होतं. “40 आमदार फोडून देखील लोकांचा आपल्याला पाठिंबा नाही हे भाजपच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे आता भाजप दोन समूहात दंगल भडकवण्याचा प्रयत्न करेल. वाट्टेल ते झालं तरी मुस्लिम तरुणांनी डोकं शांत ठेऊन भाजपचा डाव ओळखून मुंबई महानगरपालिकेत पुन्हा शिवसनेनेला सत्तेत आणू”, असं आवाहन भास्कर जाधव यांनी मुस्लिम समुदायाला केलं आहे. हिंमत असेल तर राजीनामा देऊन लोकांच्या मताला सामोरे जा, असं खुलं आव्हान बंडखोर आमदारांना जाधव यांनी केलं. माजी आमदार रामदास कदम यांच्यासह नारायण राणे यांच्यावरही भास्कर जाधव यांनी यावेळी हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.