Home /News /maharashtra /

'फडणवीसांना हात लावाल तर महाविकास आघाडी जाळून टाकू', भाजप आमदाराचा इशारा

'फडणवीसांना हात लावाल तर महाविकास आघाडी जाळून टाकू', भाजप आमदाराचा इशारा

देवेंद्र फडणवीस यांच्या पोलीस चौकशीवरुन बुलडाण्याचे भाजप आमदार आकाश फुंडकर प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीवर टोकाची टीका केली आहे.

राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 13 मार्च : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुंबई सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber Police) पोलीस बदली घोटाळा प्रकरणी गुप्तवार्ता विभागातील अहवाल बाहेर आल्या प्रकरणी नोटीस बजावल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी आज फडणवीसांच्या 'सागर' या शासकीय निवासस्थानी जाऊन दोन तास जबाब नोंदवला. देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेली नोटीस आणि चौकशीमुळे भाजप नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे बुलडाण्यात तर भाजप आमदार आकाश फुंडकर (Akash Fundkar) यांनी प्रचंड आक्रमक होत महाविकास आघाडीला जाळण्याचा शब्दोच्चार केला. त्यामुळे आता हे राजकारण आणखी कुठपर्यंत जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांनी पाठवलेल्या नोटीस पाठवल्यामुळे भाजप आज चांगलीच आक्रमक झाली. भाजपकडून राज्यभरात नोटीशींची होळी करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं. बुलडाण्यातही भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. भाजपने खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर नोटीसची होळी केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीदेखील केली. यावेळी प्रतक्रिया देताना आकाश फुंडकर प्रचंड आक्रमक झाले. "देवेंद्र फडणवीस यांना हात लावला तर नोटीसप्रमाणे महाविकास आघाडीला जाळल्याशिवाय राहणार नाही", असा इशारा आकाश फुंडकर यांनी दिला. (देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांकडून दोन तास चौकशी; नेमकं काय झालं चौकशीत?) दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना जबाब दिल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात बदल्यांचा जो महाघोटाळा झाला. या घोटाळ्याची सर्व माहिती मी केंद्रीय गृहसचिवांकडे पोहोचवली. त्यानंतर न्यायालयाने याची चौकशी सीबीआयकडे सोपवली. याचाच अर्थ महाघोटाळा घडला म्हणून सीबीआय ही चौकशी करत आहेत. महाघोटाळ्याची चौकशी राज्य सरकार करु शकत नाही कारण, सहा महिने त्यांनी अहवाल दडवून ठेवला होता. मी जर हा घोटाळा बाहेर काढला नसता तर कोट्यावधींचा घोटाळा दबून राहिला असता. 'सभागृहात विषय मांडत असल्याने मला अचानक नोटीस' "सभागृहात जे विषय मी मांडतोय, मग या सरकारच्या मंत्र्यांचं दाऊद सोबत कनेक्शन असेल किंवा विरोधी पक्षाच्या विरोधात हे सरकार कसं षडयंत्र करत आहे. यामुळेच मला अचानक पोलिसांची नोटीस आली. मी पोलिसांकडे चौकशीसाठी जाण्यासाठी तयार होतो. पण नंतर पोलिसांनी विनंती केली की, मी तुमच्याकडे चौकशीला आमची टीम पाठवतो", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, हा घोटाळा मी बाहेर काढला आहे आणि तो न्यायालयाने सुद्धा मान्य केला आहे. पोलिसांना मी सांगितलं, मी जबाबदार नेत्यासारखा वागलो. त्यासंदर्भातील पत्रही मी पोलिसांना दाखवलं. त्यासोबतच पत्रकार परिषदेत मी सांगितलं की, मी ट्रान्सक्रिप्ट किंवा पेन ड्राईव्ह कुणाला देणार नाही कारण हे मटेरिअल सेन्सेटिव्ह आहे. राज्य सरकारला तर ही माहिती देऊ शकत नाही. राज्य सरकारने जो घोटाळा दाबला त्याचे कागदपत्र राज्य सरकारला देऊन त्यांनी काय दिवे लावले असते. या सर्व कागदपत्रांमध्ये आयपीएस अधिकाऱ्यांची नावे होती आणि आयपीएस अधिकाऱ्यांची कॉम्पिटेंट अथॉरिटी केंद्रीय गृहसचिव असल्याने ही सर्व कागदे मी केंद्रीय गृहसचिवांना दिली. तसेच सेन्सेटिव्ह मटेरिअल मी उघड केली नाही. पण त्याचवेळी सीक्रसीचा भंग झाला असेल तर तो कुणी केला? जी कागदपत्रे मी केंद्रीय गृहसचिवांंना दिली ती कागदपत्रे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या