किरण मोहिते, प्रतिनिधी बारामती, 15 जानेवारी : छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकावरुन मोठा वादंग निर्माण झाला. तर दुसरीकडे या पुस्तकावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे यांच्यात वाकयुद्ध पेटले. आता या वादात शिवेंद्रराजेंनी उडी घेत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी उदयनराजें हे छत्रपतींचे वंशज आहेत हे पुरावे द्यावे अशा प्रकारचे भाष्य केले होते. याला प्रतिउत्तर म्हणून भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संजय राऊत यांचा वर निशाणा साधत हा वाद संजय राऊत यांनी तयार केला आहे, तो त्यांनीच संपवावा, असं आवाहन केलं आहे. तसंच, ‘अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही कोणत्या घराण्यात जन्माला आलो आहोत त्यांना कोणता पुरावा पाहिजे तो त्यांनी सांगावा आणि संजय राऊत यांनी भाषा शैली नीट वापरावी, असा इशाराही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला. दरम्यान, पुण्यात दैनिक लोकमतच्या कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर हल्लाबोल केला. उदयनराजे यांनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली आहे. लोकमत समुहाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा हेही यावेळी उपस्थित होते. मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला. उदयनराजे हे साताऱ्याचे माजी खासदार ते भाजपचे नेते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचे वंशज आहेत. शरद पवारांना आम्ही जाणते राजे मानतो तर उदयनराजे ना राजे मानतो. शरद पवार हे जाणते राजे जनतेने उपाधी दिली हिंदू हृदयसम्राट ही उपाधी बाळासाहेबांना जनतेने दिली आहे. रयतेचा राजा लूटमार करणारे राजे होऊ शकत नाहीत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी उदयनराजे यांना टोला लगावला. उदयनराजेंची शिवसेनेवर टीका पुस्तकातल्या मजकुराबद्दल वाईट वाटलं, महाशिवआघाडीतून शिव का काढून टाकलं? शिवसेना जेव्हा काढली तेव्हा वंशजांना विचारायला आली होती का? अशा शब्दात उदयनराजेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेनेला नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारायला आला होता का? शिवाजी महाराज कुणी होऊ शकत नाही. महाराजांचे वंशज म्हणून कधी नावाचा दुरुपयोग केला नाही. आम्ही त्या घराण्यात जन्माला आलो याचा सार्थ अभिमान असल्याचेही उदयनराजे यांनी सांगितलं आहे. उदयनराजेंची शरद पवारांवर टीका भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.‘अनेकजण स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात. पण जाणता राजा या जगात फक्त एकच आहे, ते म्हणजे शिवाजी महाराज. त्यामुळे कोणालाही जे जाणता राजा म्हणतात, त्याचाही मी निषेध करतो,’ असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी पवारांवर निशाणा साधला होता. शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान मोदींशी केली. मात्र जगात शिवाजी महाराज यांची उंची गाठता येईल, असे कुणी नाही, असेही उदयनराजे म्हणाले होते. उदयनराजे म्हणाले, कुणालाही ‘जाणता राजा’ची उपमा देणं याचा निषेध करतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराज म्हणजे युगपुरुष होते, असे सांगत लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का? असा सवालही उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







