मुंबई, 11 जानेवारी : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज ईडीने छापेमारी केली. सकाळी सहा वाजेपासून ही करावाई सुरू आहे. हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील घरावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली. हसन मुश्रीफ यांच्यासोबत त्यांचे व्यवसायिक भागिदार, समर्थक आणि त्यांच्या मुलीच्या घरावर देखील ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. आता यावरून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं आहे. या छापेमारीनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी आणि हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे सरकारमधील आणखी एका माफिया मंत्र्यावर कारवाई असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हटलं सोमय्या यांनी?
हसन मुश्रीफ यांच्या घरावर पडलेल्या ईडीच्या छाप्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हसन मुश्रीफ का एवढी घाई करत आहेत? पहिला नंबर अनिल परब यांचा त्यानंतर हसन मुश्रीफ आणि मग अस्लम शेख असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेनं मला आज आशीर्वाद दिला. मी तेव्हा कोल्हापूरला जायला निघालो होतो, मात्र मला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी जाऊ दिलं नाही. हसन मुश्रीफ मंत्री असताना त्यांनी जावायला मदत केली असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन
दरम्यान या सर्व प्रकरणावर हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी काही कामानिमित्त बाहेर आहे. त्यामुळे मला ही सर्व माहिती फोनवरून मिळाली. छापे पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी कागल बंदची हाक दिल्याचंही मी प्रसारमाध्यमांद्वारे ऐकत आहे. पण मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी शांत राहावं. कायदा सुव्यवस्था हाती घेऊ नये. सरकारी अधिकाऱ्यांना सहकार्य करावं असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Kirit Somaiya