27 डिसेंबर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आलीये. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या बातमीला दुजोरा दिलाय.
भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणामुळे एकनाथ खडसेंना महसूल मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. अलीकडे हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्यावरील चौकशी समिती असलेल्या झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे खडसेंची घरवापसी लांबणीवर गेलीये.
त्यामुळे नाराज असलेले एकनाथ खडसे आता विरोधकांच्या गळाला लागले आहे. एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी शक्यता आहे.
जळगावमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा मेळावा होणार आहे. यावेळी अनेकजण नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. गेल्या निवडणुकीच्या वेळी भाजप आणि शिवसेनेमध्ये गेलेले राज्यातील अनेक नेते घरवापसी करणार आहे. त्याबाबत अनेकजण पक्षनेतृत्वाशी चर्चा करत आहेत अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. तसंच राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो असं म्हणत एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबाबत संकेत दिले आहे.
न्यूज18 लोकमतने एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी यावर बोलणं टाळलं. तर राष्ट्रवादीचीही जुनी खेळी आहे, एकनाथ खडसे भाजप सोडणार नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NCP, एकनाथ खडसे, जळगाव, नवाब मलिक, भाजप, राष्ट्रवादी