भिवंडी, 29 जुलै: अनेक परिसरांमध्ये पावसाळ्या आधी खड्डे बुझवले नसल्यानं मोठ्या प्रमाणात वारंवार दुर्घटना घडल्याचे प्रकार समोर आली आहेत. भिवंडीमध्ये पुन्हा एकदा खड्ड्यामुळे एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर नागरिकांनी संतापाची भावना व्यक्त केली आहे.
भिवंडीतील वाडा रोड इथे मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य आहे. रात्री तरुण जात असताना खड्ड्यात गाडी आदळल्यानं ती उडाली आणि तरुणाचा ताबा सुटला अन् समोरच्या वाहनावर जाऊन आदळली. या दुर्घटनेमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. स्वप्नील जाधव असे 22 वर्षीय मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचे मूळ गाव पिसेगाव असून तो शेलार इथं राहत होता.
हे वाचा-5 सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली 3 मजली इमारत, दुर्घटनेचा LIVE VIDEO
इथे पाहा दहावीचा निकाल
स्वप्नील जाधव कोपर येथील तेज कुरियर कंपनीत कामाला होता. रात्री कवाड येथील काम आटपून घरी येत असताना मुसळधार पाऊस सुरु असल्याने रस्त्यावर खूप पाणी साचलं होतं. त्यामुळे खड्डे दिसले नाहीत. त्याचवेळी खड्डात दुचाकी आदळली. याचवेळी मागून येणाऱ्या वाहनानं जोरदार धडक दिल्यानं मोठा अपघात झाला. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
या अपघातानंतर रस्त्यावरील खड्डे का भरले नाहीत याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यंदाचा पावसाळा सुरू झाल्यानंतर भिवंडीत खड्ड्यांमुळे मंगळवारी पहिला बळी गेल्यानं संताप व्यक्त होत आहे.