अहमदनगर, 2 जानेवारी : अहमदनगर जिल्ह्यातील अपहरण झालेल्या 200 लहान बालकांपैकी 77 बालकांचा शोध पोलिसांना लागला आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या 'ऑपरेशन मुस्कान'द्वारे बालकांसह हरवलेल्या 1 हजार 11 प्रौढ व्यक्तींचाही शोध पोलिसांनी घेतला आहे.
अपहरण झालेली मुलं आणि हरवलेल्या व्यक्तींना पुन्हा त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आलं. यावेळी कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलल्याचं पाहायला मिळालं.
अहमदनगर जिल्ह्यात हरवलेल्या व्यक्तींसाठी पोलिसांकडून ऑपरेशन मुस्कान राबविण्यात आले. जिल्ह्यात 200 लहान मुलांच्या अपहरणाचे गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 77 बालकांचा शोध घेण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 2 हजार 301 व्यक्ती हरवल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यात घरातून रुसून गेलेली आणि त्रासास कंटाळून घराबाहेर गेलेलीही मुले पुन्हा परिवारात सुखरूप परतली.
हेही वाचा - मुंबईत 2021 मधील पहिली Murder Case, बॉयफ्रेंडने 19 वर्षीय मुलीला संपवलं
1 हजार 210 महिलांपैकी 621 आणि 1 हजार 91 पुरुषांपैकी 390 जणांचा शोध घेण्यात आलेला आहे. एक डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये 1 हजार 88 बालके व महिला, पुरुषांचा शोध घेण्यात आलेला आहे. नगर जिल्ह्यामध्ये शोध घेताना पोलिसांकडे कुठल्याही प्रकारची तक्रार नसलेल्या आणि रेकॉर्ड बाहेरील 47 मुले आढळून आली आहेत.
दरम्यान, या कामगिरीमुळे पोलिसांचं कौतुक करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Crime news