बीड, 03 जानेवारी : साखरेप्रमाणे गुळाला हमीभाव नसल्याने सध्या गुऱ्हाळ चालकांपुढे समस्यांचा डोंगर उभा आहे. गुऱ्हाळाच्या पारंपरिक पद्धतीत खर्च अधिक आहे. यातून गुळाला मिळणार भाव देखील सध्या कमी मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रति क्विंटल 700 ते 800 रुपये भाव कमी मिळत आहे. यामुळे कमी दराने गुळाची विक्री करून नुकसान सोसावे लागत आहे. तोट्यात व्यवसाय करावा लागत असल्याने बीड जिल्ह्यातील पारंपारिक गुऱ्हाळं बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
दैनंदिन जीवनामध्ये आपण गुळाचा खाद्यपदार्थांमध्ये आवर्जून वापरतो. गुळामध्ये कॅल्शिअम देखील असल्यामुळे गूळ तितकाच गुणकारी आहे. मात्र यावर्षी पारंपारिक गुऱ्हाळ चालकांना योग्य तो भाव मिळत नसल्यामुळे गूळ उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. संक्रांतीला गुळाची अधिक मागणी असते. यामुळे गुळाच्या भावात तेजी येते. मात्र सध्याचे भाव पाहता गूळ उत्पादक अडचणीत असल्याचे पाहायला मिळत आहेत. गतवर्षी 3 हजार रुपये क्विंटल गुळाचा दर होता. मात्र यंदा हंगामाच्या पहिल्या टप्प्यापासूनच दराच्या घसरणीचा सामना करावा लागत आहे. 2 हजार 300 रुपये क्विंटल दर मिळत आहे. मात्र हा दर परवडणारा नसल्याचे गूळ उत्पादक सांगतात.
आजही बीड जिल्ह्यात 50 पेक्षा अधिक पारंपारिक पद्धतीने गुऱ्हाळ चालवले जातात. यामध्ये काही प्रमाणात आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जोड धंदा म्हणून शेतकरी गुऱ्हाळ चालवतात. कारखान्यांनी वाढवलेली गाळप क्षमता आणि गूळ उत्पादक चालकांपेक्षा दिला जाणारा अधिकचा दर, गूळ पावडरचे उत्पादन घेणारे नवनवे कारखाने या मध्ये पारंपारिक गुऱ्हाळ चालवणे तोट्याचे झाले आहे.
यंदा भावच नाही
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा साखर कारखान्यांकडून 2 हजार 500 रुपये प्रति टन पेक्षा अधिक दर मिळत आहे. गुळाची परिस्थिती मात्र नेमकी उलटी झाली आहे. बाजारात सध्या 2 हजार 300 ते 2 हजार 400 रुपये प्रति क्विंटल इतका खाली दर आला. वाढती महागाई पाहता तीन हजार रुपये प्रति क्विंटल जर दर मिळाला तरच पारंपारिक गूळ उत्पादक शेतकरी भविष्यामध्ये टिकू शकेल.
बाहेरून गुळाची आयात
बीड जिल्ह्याच्या आसपासच्या जिल्ह्यामधून गुळाची आवक ही बीड जिल्ह्यामध्ये होत आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये गुऱ्हाळाची संख्या मराठवाड्याच्या तुलनेत जास्त असून हायजेनिक पद्धतीने बॉयलर गुळाचे उत्पादन केले जाते. त्यामुळे अधिक प्रमाणात गूळ तयार होऊन संपूर्ण महाराष्ट्रभर ट्रान्सपोर्ट केला जातो.
पारंपारिक गुऱ्हाळ अत्यंत जुन्या काळापासून अत्यंत कष्टाचे आणि स्थानिक लोकांना रोजगार देणारे क्षेत्र आहे. पाच ते सहा महिने गुऱ्हाळ चालते. भट्टीवर व कढईवर काम करण्यासाठी कुशल मजूर लागतात तर एकूण गुऱ्हाळामध्ये वीस ते पंचवीस माणसाला रोजगार उपलब्ध होतो.
Video : कोरोनाच्या भीतीनं वाढले लिंबाचे दर? पाहा Ground Report
भावच नसल्यानं अडचणी वाढल्या
मागील वीस वर्षापासून पारंपारिक पद्धतीने गुऱ्हाळाच्या माध्यमातून आम्ही उत्पादन घेतोय. मात्र यावर्षी मोठ्या संख्येने शेतकरी योग्य भाव मिळाल्यामुळे ऊस हा कारखान्याला नेऊन घालत आहे. यासह महागाईमध्ये देखील वाढ झाली आहे आणि मोठ्या प्रमाणात कामगार कामासाठी देखील मिळत नाहीयेत. बाजारपेठामध्ये योग्य तो भाव नसल्यामुळे आर्थिक तोट्यामध्ये आम्हाला गुळाचे उत्पादन घ्यावे लागत असल्याचे गुऱ्हाळ चालक गणेश लव्हाळे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.