रोहित देशपांडे, प्रतिनिधी
बीड, 24 मार्च: प्रत्येक गाव शहर बदलले की तिथल्या राहणीमान आणि खाद्य संस्कृतीमध्ये बदल झालेला दिसून येतो. प्रत्येक गावामध्ये चवदार खाद्यपदार्थ मिळणारं एक ठिकाण असतं आणि गावातील खवय्यांची त्या ठिकाणी गर्दी होत असते. बीडमधील माजलगावमध्ये देखील खवय्यांचं एक असंच आवडतं ठिकाण असून तिथे झणझणीत आणि चविष्ट पुरी भाजी मिळते. गेल्या 20 वर्षांपासून दीपा नाष्टा सेंटरमध्ये पुरीभाजीची चव चाखण्यासाठी लोक आवर्जून येत असतात.
पुरीभाजीसाठी प्रसिद्ध दीपा नाष्टा सेंटर
रामचंद्र डुकरे यांनी साधारणतः वीस वर्षांपूर्वी या दीपा नाष्टा सेंटरची सुरुवात केली. माजलगाव येथील जुन्या बस स्थानक परिसरामध्ये दीपा नाष्टा सेंटर आहे. विशेष म्हणजे हे नाष्टा सेंटर एखादे मोठे हॉटेल नसून माळवदामध्ये असणाऱ्या छोट्याशा चार खणामध्ये आहे. नाष्टा सेंटर सुरू झाले तेव्हा पुरी भाजीची प्लेट अवघ्या पाच रुपयाला होती. तेव्हा हे हॉटेल केवळ पुरीभाजीचे नव्हते. मात्र ग्राहकांना येथील पुरीभाजी आवडू लागली आणि त्यासाठी खवय्यांची गर्दीही जमू लागली.
घरगुती मसाल्यांच वापर
घरगुती तयार केलेला मसाला, यासह आलु, मटर, त्यामध्ये बटाटा आणि झणकेबाज काळं तिखट, कांदा, मिरची याची पेस्ट तयार करून सकाळी साडेसहाच्या सुमारास भाजी तयार केली जाते. या सोबतच आवर्जून गावरान दह्यापासून कडी, देखील तयार केली जाते आणि त्यामुळेच ही भाजी अधिक चवदार लागते. तर गावरान गव्हापासून पुऱ्या केल्या जातात.
पुण्यातील 'या' स्टॉलवर वडापावसाठी लागते चक्क रांग! पाहा काय आहे खास, Video
दिवसाला 200 प्लेटची विक्री
सुरुवातीला या पुरीभाजी सेंटरची सुरुवात झाली तेव्हा दिवसाकाठी वीस ते तीस प्लेटची विक्री होत होती. तर पाच रुपयाला प्लेट मिळत होती. आता याच पुरीभाजीच्या प्लेटचा दर 40 रुपये झाला आहे आणि दिवसाकाठी 200 पेक्षा अधिक प्लेटची या ठिकाणी विक्री होते. यामध्ये पुरी, बटाट्याची भाजी, कांदा, कडी आणि झणझणीत अशी गावरान मसाल्यापासून तयार केलेली बटाट्याची भाजी दिली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Beed news, Local18, Local18 food