बीड, 02 नोव्हेंबर : हिवाळ्यात सांधे आणि हाडे दुखण्याच्या समस्या अनेकांना जाणवतात. संधिवात असलेल्या लोकांसाठी हा काळ खूप कठीण असतो. तापमानात घट होताच सांधे जखडून जातात आणि हाडांमध्ये वेदना सुरू होतात. वृद्ध लोकांना तर उठणं-बसण्याचा त्रास सहन करावा लागतो. हिवाळ्यात व्यायाम आणि पौष्टिक आहाराद्वारे सांधेदुखीच्या रुग्णांना दिलासा मिळतो. हिवाळ्यातच सांधे आणि हाडांच दुखणं अधिक का जाणवत, यावर काय उपाय फायद्याचे ठरू शकतात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट.
तापमान जसजसं घटतं, तसं काही लोकांमध्ये हाडांशी निगडित समस्या वाढतात. थंडीमध्ये अनेक ज्येष्ठांना सांधेदुखीचा त्रास जाणवतो. थंडीची चाहूल जाणू लागली आहे. थंडीचे प्रमाण जसे जसे वाढत आहे. तसे अनेक आजार आपले डोके वर काढतात. थंडीत हाडांचे आजार देखील उद्भवल्याचं अनेक जण सांगतात. बदलत्या जीवनशैलीमध्ये कमी वयातच सांधेदुखी, अंगदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणू लागतो. थंडीच्या दिवसांमध्ये अनेक जण घराबाहेर पडत नाहीत. शरीराची हालचाल कमी होते. यामुळे सांधेदुखी, अंगदुखीच्या समस्या जाणवतात.
डायबेटिसच्या रुग्णांनी ऊसाचा रस प्यावा की नाही? वाचा फायदे अन् तोटे
पौष्टिक आहार, व्यायाम देखील आवश्यक
शरीराला आवश्यक पोषक तत्त्वांची गरज असते. यासाठी आपल्या आहारात पौष्टिक घटकांचा समावेश आवश्यक आहे. तसेच शरीराला कोवळा सूर्यप्रकाश देखील आवश्यक असतो. एकंदरीत व्यायाम, पौष्टिक आहार यांच्या समन्वयाने शरीर मजबूत ठेवता येतं. मात्र, या गोष्टींची कमतरता आणि त्यातच हिवाळ्याचे दिवस असतील तर सांधेदुखी, अंगदुखी अशी समस्येला सामोरे जावं लागतं. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला आवश्यक तेवढा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे हाडाच्या जॉईंटमध्ये सूज निर्माण होते. संधिवाताचे दुर्धर आजार असणाऱ्या रुग्णांना या दिवसांमध्ये अधिक त्रास जाणवतो. थंडीच्या दिवसात गरम कपडे न वापरल्यामुळे देखील हाडांचे दुखणे वाढू शकते.
हृदयाच्या आरोग्यासाठी आहारात `या` मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा समावेश हवाच
थंडीच्या दिवसात ह्या गोष्टी टाळा
थंडीच्या दिवसात मद्य सेवनाने देखील हाडावर परिणाम होतो. हाडे कमकुवत होतात. तसेच मिठाचे अती सेवन देखील घातक ठरू शकते. मिठामुळे हाडे ठिसूळ किंवा दुखू शकतात. कॉफीच्या अति सेवनाने देखील हाडांच्या समस्या उद्भवतात. सकाळी व्यायाम करताना शक्यतो मातीवरच रनिंग किंवा व्यायाम करावा. चांगल्या दर्जाचे बुटाचा वापर करावा. रस्त्यावर किंवा सिमेंटवर रनिंग केल्यावर हाडांवर सूज निर्माण होते. हिवाळ्यात तेल, तूप अशा पदार्थाचे सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कायम राहते. हिवाळ्यात तीळ खाण देखील फायद्याचं आहे. तसेच कडधान्यातून मानवी शरीरासाठी उपयुक्त असे कॅल्शिअम मिळते. यातून सांधेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. मात्र, त्रास अधिक असेल तर वेळीच डॉक्टरला दाखवणे आवश्यक आहे अशी माहिती बीड येथील स्पाईन सर्जन डाॅक्टर गणेश केदार यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.