मुंबई, 01 नोव्हेंबर : सध्याच्या काळात जीवनशैलीत मोठा बदल झालेले दिसून येतात. जीवनशैलीत बदल झाल्याने साहजिकच त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. ताण-तणाव, अवेळी आणि अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, बैठं काम आदी कारणांमुळे गंभीर आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आजकाल कमी वयातच हृदयविकार, डायबेटिस, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत. गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. विशेष म्हणजे, कमी वयाच्या व्यक्ती या गोष्टीचे मोठ्या प्रमाणावर बळी ठरत आहेत. अशा स्थितीत आहार आणि विहार या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. हृदयाशी संबंधित विकार दूर ठेवण्यासाठी तुम्ही आहारात सकारात्मक बदल करणं गरजेचं आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी मॅग्नेशियमयुक्त पदार्थ उपयुक्त ठरतात. यासाठी मॅग्नेशियमयुक्त पदार्थ नेमके कोणते हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. `आज तक`ने या विषयीची माहिती दिली आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकार, डायबेटिससारखे गंभीर आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. उत्तम आरोग्यासाठी पोषक आहार गरजेचा असतो. रक्तदाब, कोलेस्टेरॉलसारखे हृदयाशी संबंधित आजार दूर ठेवण्यासाठी आणि एकूण हृदयाच्या आरोग्यासाठी मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असावा, असं तज्ज्ञ सांगतात. मॅग्नेशियम हे शरीरासाठी अत्यावश्यक खनिज आहे. त्यामुळे त्याला मास्टर खनिज असंही म्हणतात. काही पदार्थांमध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतं. मॅग्नेशियममुळे हृदयाचे स्नायू बळकट होतात आणि या स्नायुंशी संबंधित विकार होत नाहीत.
हेही वाचा - Mental Health : मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश
हिरव्या पालेभाज्यांमध्ये मॅग्नेशियम मुबलक असतं. त्यामुळे रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा. पालक, मेथी, मोहरी, केळीची भाजी यासारख्या भाज्यांमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते. या भाज्या खाल्ल्यास शरीरातील मॅग्नेशियमची गरज भरून निघते.
सब्जा, सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया हे मॅग्नेशियमचे उत्तम स्रोत आहेत. त्यामुळे या बियांचा रोजच्या आहारात समावेश करावा. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थच्या आकडेवारीनुसार, या बियांमध्ये आयर्न, मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि ओमेगा -3 फॅटी अॅसिड्स मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहते.
केळी स्वस्तात आणि सहज उपलब्ध होतात. केळी हा पोटॅशियमचा उत्तम स्रोत आहे. पोटॅशियममुळे हृदय विकाराची जोखीम कमी होते. यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं रोज केळाचं सेवन केलं पाहिजे.
डार्क चॉकेलट्समध्ये मॅग्नेशियमसह अनेक पोषक घटक असतात. ‘न्युट्रिएंट्स’मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, डार्क चॉकलेटमध्ये आयर्न, कॉपर आणि मॅंगेनीजचं प्रमाण जास्त असतं. यात फ्लेवनॉल्स असतात. हृदयाच्या आरोग्यासाठी यासर्व गोष्टी फायदेशीर असतात. फ्लेवनॉल्स हा एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असून, शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याचं काम तो करतो. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, असं अनेक संशोधनांमधून स्पष्ट झालं आहे.
हृदयाच्या आरोग्यासाठी नट्स आवश्यक असतात. यात अँटिइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्याचं काम नट्स करतात. हृदयाच्या सुरक्षेसाठी आणि एकूण आरोग्यासाठी रोज मूठभर नट्स खाणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle