सुरेश जाधव, बीड बीड, 21 एप्रिल : बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुझ्या वडिलांनी लग्नात काहीच दिले नाही म्हणून पतीने पत्नीची धारधार शस्त्राने हत्या केली. बीडच्या माजलगाव शहरात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
बीडच्या माजलगाव शहरातील भाटवडगाव परिसरातील पतीने पत्नीची धारदार हत्याराने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रतिभा अनंत सुगडे (वय-29) मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुझ्या घरच्यांनी लग्नात काहीच दिले नाही, असे म्हणत एका महिलेला गेल्या अनेक दिवसापासून तिचा पती शारीरिक व मानसिक त्रास देत होता. यातच काल नराधम पतीने पत्नीस मारहाण केली आणि धारदार शस्त्राने तिच्यावर वार केले. यात ती गंभीर जखमी झाली. यानंतर प्रतिभा सुगडे या महिलेला माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. मृत महिलेच्या भाऊ प्रथमेश प्रकाश पंडित याच्या फिर्यादीवरून आरोपी अनंत भागवत सुगडे विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसात हत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.