बीड, 2 जुलै: आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. पावसाळ्यात विविध आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. साचलेल्या पाण्यातून विविध आजार उद्भवण्याचा धोका असतो. या दिवसांत डेंग्यू, चिकनगुन्या, मलेरिया आदी आजारांचं प्रमाण वाढतं. ते टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेतली जाते. परंतु, नागरिकांनीही योग्य ती काळजी घेण्याची गरज असते, असे बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे सांगतात. पावसाळ्यात या आजारांचा धोका डेंग्यू ताप हा आजार विशिष्ट विषाणूंमुळे होतो. या आजाराचा प्रसार एडिस इजिप्ती नावाच्या डासाच्या मादीमार्फत होतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. सिमेंटच्या टाक्या, रांजण, प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, नारळाच्या कवट्या, घरातील शोभेच्या कुंड्या, निरुपयोगी वस्तू, टायर्स, कुलर मध्ये साठलेल्या पाण्यात या डासाची मादी अंडी घालते. एक मादी एका वेळी दीडशे ते दोनशे अंडी घालते व यातूनच या डासांची मोठी उत्पत्ती होते. हाच डास चावल्याने डेंग्यू सारखा आजार होतो. तसेच चुकनगुनिया, मलेरिया आदी आजारांचा फैलावही असाच होतो.
काय आहेत लक्षणे? पावसाळ्यामध्ये डेंग्यू, चिकनगुनिया तसेच मलेरिया हे आजार उद्भवू नयेत, यासाठी योग्य काळजीची गरज असते. डेंग्यू तापात रुग्णास 2 ते 7 दिवस तीव्र स्वरूपाचा ताप येतो. डोके दुखी, सांधे दुखी, स्नायू दुखी असा त्रास होतो. रुग्णास उलटया होतात, डोळयाच्या आतील बाजूस दुखणे, अंगावर लालसर पुरळ येणे, नाकातोंडातून रक्तस्राव होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे, शौच्यावाटे व उलटीतून रक्त पडणे ही लक्षणे दिसून येतात. तर चिकनगुनियामध्ये तीव्र ताप आणि तीव्र स्वरुपाची सांधेदुखी असते. अशी लक्षणे दिसून आलेल्या रुग्णास तात्काळ नजिकच्या शासकिय रुग्णालयात दाखल करावे. तपासणी व उपचार मोफत उपलब्ध आहेत, असे डॉ. साबळे यांनी सांगितले. पावसाळ्यात कांदा-लसूण का खाऊ नये? राक्षसाशी काय आहे संबंध? अशी घ्या काळजी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा. आठवड्यातून एक दिवस कोरोडा दिवस पाळा. घरातील शोभेच्या झाडांच्या कुंडीखाली ठेवण्यात येणाऱ्या प्लेटमध्ये पाणी साचू देऊ नये. एअर-कुलरमधील तसेच फ्रीजच्या मागील भागात साचलेले पाणी नियमितपणे काढून टाकावे. वातानुकूलित यंत्रातून पडणारे पाणी ट्रे अथवा बादलीमध्ये जमा होत असेल तर दररोज असे जमा होणारे पाणी काढून टाकावे. पाणी साठविण्याची सर्व भांडी, टाक्या, इत्यादी योग्य प्रकारे झाकून ठेवणे. नारळाच्या करवंटय़ा, रबरी टायर्स, रिकामे डबे यामध्ये पाणी साचून राहते म्हणून अशा वस्तू कचराच्या डब्यात फेकून देणे. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. आपले घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. गप्पी मासे डासांच्या अळ्या खातात. म्हणून साठवणीच्या / साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडावेत, असे डॉ. सुरेश साबळे यांनी सांगितले.