बीड, 25 जुलै: दरवर्षी शाळा महाविद्यालय शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. बीड जिल्हा परिषदेने मात्र शाळांसाठी अनोख्या सहलीचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषद शाळेतील पाचवी ते आठवी या वर्गातील अकरा विद्यार्थी थेट अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’च्या सहलीला जाणार आहेत. विशेष म्हणजे हे विद्यार्थी पहिल्यांदाच विमान प्रवास करणार असून त्यांच्या पासपोर्टची तयारी झाली आहे. बीड जिल्हा परिषदेचा अनोखा उपक्रम बीड जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यंसाठी इस्रो आणि नासा भेटीचा अनोखा उपक्रम राबविला. स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून इस्रो आणि नासा भेटीसाठी विद्यार्थ्यांची निवड केली. काही दिवसांपूर्वीच बेंगरुळ येथील इस्रो सहलीवरून विद्यार्थी आले आहेत. आता अकरा विद्यार्थी नासा भेटीसाठी जाणार आहेत. या सहलीची राज्यभर चर्चा झाली. विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्हा परिषदेनंतर असा उपक्रम राबविणारी बीड जिल्हा परिषद ही राज्यातील दुसरी आणि मराठवाड्यातील पहिलीच जिल्हा परिषद ठरली आहे.
कशी झाली निवड? बीड जिल्हा परिषदेने शाळांतील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक परीक्षा घेतली. सुरुवातीला केंद्र स्तरावर त्यानंतर तालुका आणि जिल्हा स्तरावर परीक्षा झाली. केंद्रातून निवडलेले विद्यार्थी तालुका आणि तालुक्यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावरील परीक्षा दिली. यातून प्रत्येक तालुक्यातून एक अशा अकरा विद्यार्थ्यांची निवड अमेरिकेतील नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन अर्थात नासाच्या भेटीसाठी निवड झाली आहे. लवकरच हे विद्यार्थी नासाला जाणार आहेत, अशी माहिती, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिली. विद्यार्थी पहिल्यांदाच करणार विमान प्रवास नासा सहलीसाठी निवड झालेले विद्यार्थी हे बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी आणि विद्यार्थ्यांनीही विमान प्रवास केलेला नाही. त्यांच्या पासपोर्टची तयारी पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांत विज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी आणि त्यांना संशोधन क्षेत्राची माहिती व्हावी यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. इंजिनियरची नोकरी सोडली अन् झाले अप्पर पोलीस अधीक्षक, दबंग अधिकाऱ्याची स्पेशल कहाणी जिल्हा नियोजन समितीकडून 1 कोटीचा निधी या सहलीसाठी एक कोटी रुपयाचा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध करण्यात आला आहे. आठ सप्टेंबर पासून दहा दिवस अमेरिकेत या सहलीचे नियोजन असणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी या नासा सहलीसाठी पुढाकार घेतला आहे. या विद्यार्थ्यांची झाली निवड वैभव पिसाळ, जयवर्धन झांजे, शिवप्रसाद कोकाटे, अंशुमन दुबे, प्रतीक गव्हाणे, अजय शेळके, विशाल गायके, भाविका फड, पृथ्वीराज पवार, युवराज सानप, पार्थ मुंडे, या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सदरील सर्व विद्यार्थी पाचवी ते आठवी वर्गातील आहेत. त्यांच्यासोबत काही अधिकारीही असणार आहेत.