बीड, 16 ऑक्टोंबर : मागच्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातील कित्येक जिल्ह्यात झालेल्या पावसाने पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या परतीच्या पावसाने हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
दरम्यान परतीच्या पावसानं झालेलं सोयाबीनचं नुकसान आणि खासगी फायनान्सचं घेतलेलं कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून परभणी जिल्ह्यातील कौसडी येथील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली. विषारी औषध घेऊन शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. गुलाब जीवने (वय, 24 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.
महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाल्याने पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक अस्मानी संकटामुळे गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्या कर्जाच्या ओझ्यामुळे काही शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील तरूण शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता परभणी जिल्ह्यातील कौसडी येथील शेतकऱ्यांने आत्महत्या केली आहे. अवघ्या 24 वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : गोंदियामध्ये पुन्हा 1 कोटी 75 लाखांचा धान घोटाळा, तक्रार दाखल होताच संचालक पळाले
सोयाबीन पिकाचं नुकसान आणि खासगी फायनान्सचे घेतलेलं कर्ज कसं फेडायचे या विवंचनेतून गुलाब जीवने यांनी आत्महत्या केली आहे. तरुण शेतकरी गुलाब जीवने यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. या शेतात त्यांनी सोयाबीन लावले होते. मात्र, परतीच्या पावसाने हे सोयाबीन वाया गेले. त्यातच खासगी फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज डोक्यावर आणि नुकसान पाहता हे कर्ज फेडायचे कसे व आपला प्रपंच चालवायचा कसा या विवंचनेत गुलाब जीवने यांनी विषारी औषध प्राशन केले.
या घटनेनंतर तत्काळ गावकऱ्यांनी त्यांना बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचार करुन त्यांना परभणी येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, त्या ठिकाणी गुलाब जीवने यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात लहान भाऊ आणि आई आहे.
हे ही वाचा : घरात आला आणि मुलाशी बोलत होता, लोकांनी पकडून दिला चोप, भिवंडीतला LIVE VIDEO
स्वाभिमानीच्या रविकांत तुपकरांची सरकारवर टीका
सत्तेची धुंदी आणि एकमेकांचा पक्ष संपवण्याच्या नादात व्यस्त असलेल्या राजकारणी आणि सरकारला अन्नदात्या शेतकऱ्यांकडे पाहायला वेळ नाही. त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालायलाच हवे असा इशारा तुपकरांनी दिली आहे. आमच्या शेतकरी दादाची ही आहुती वाया जाऊ देणार नाही. माझी भावपूर्ण श्रद्धांजली! असं तुपकर यांनी म्हटलं आहे.