बीड, 04 डिसेंबर : शासनाच्या लालफितशाहीचा कारभार आणि प्रशासन किती गेंड्याच्या कातडीच असतं याचा नमुना बीडमध्ये पाहायला मिळाला आहे. हक्काचे घरकुल बांधून मिळावे तसेच उरलेले हप्ते मिळावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणाला बसलेल्या एका उपोषणार्थीकडे लक्ष द्यायला जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला वेळ मिळाला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातच थंडीने कुडकुडत या उपोषणार्थी वृद्ध व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृत्यूला स्वतः जिल्हाधिकारी जबाबदार की प्रशासन आणि त्यांची दिरंगाई ? याची चौकशी होणे आता गरजेचे असल्याचा सवाल नागरिकांनी केला आहे.
हे ही वाचा : पतीला सोडून बहिणीसोबत हनिमूनला गेली नवरी; संपूर्ण सत्य समजताच नवरदेवाची पोलिसांत धाव
मिळालेल्या माहितीनुसार, आप्पाराव भुजाराव पवार हे वासनावाडी येथील रहिवासी आहेत. ते कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. शासनाने मंजूर केलेले घरकुल तातडीने बांधून देण्यात यावे. यासह इतर मागण्यांसाठी पवार हे कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषण करत होते.
मात्र या उपोषन करणाऱ्या व्यक्तीची साधी दखलही घ्यायला जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांच्यासह प्रशासनाला वेळ मिळाला नाही. दरम्यान पवार यांचा सकाळी मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याबाबत उपोषणकर्त्यांच्या कुटुंबियांनी याविरोधात आवाज उठवला आहे.
हे ही वाचा : नवरदेवाला वरमाळा घालताच भयानक घडलं; लखनऊमध्ये नवरीचा स्टेजवरच मृत्यू
दरम्यान याला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. वारंवार निवेदने आणि अर्ज देऊन देखील त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळेच त्यांच्यावर उपोषणाची वेळ आली आणि अखेर थंडीने कुडकुडल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.