रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 24 जून: यंदा जून महिना संपत आला तरी राज्यात मान्सूनने दडी मारली होती. आता राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी बीड जिल्हा मात्र पावसाच्या प्रतिक्षेतच आहे. पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या असून शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेत. दुसरीकडे जिल्ह्यातील 143 प्रकल्पपैकी 21 प्रकल्प कोरडे आहेत. तर 58 प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. 90 विहिरींचे अधिग्रहण बीड जिल्ह्यातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत चालली आहे. जिल्ह्यातील 143 प्रकल्पांकपैकी 21 प्रकल्प कोरडे तर 58 जोत्याखाली आहेत. सर्व प्रकल्पात केवळ 18.21 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यातील 130.385 दलघमी पाणी उपयुक्त आहे. अद्याप ग्रामीण भागात पाण्याची फारशी गंभीर परिस्थिती उद्भवली नसली तरी 90 गावातील 90 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. चालू महिन्यात पाऊस झाला नाही तर पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
भीषण पाणी टंचाईची शक्यता बीड जिल्ह्यातील कोल्हापुरी पद्धतीच्या 13 बंधाऱ्यात पाणीसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. यासह बीड जिल्ह्यातील आष्टी, शिरूर, कासार यासह धारूर तालुक्यात देखील पाण्याची टंचाई जाणवत आहे. तर अनेक खेडेगावात पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे या महिन्यात पाऊस पडणे गरजेचे आहे. नाहीतर बीड जिल्हा वासियांना पुन्हा एकदा भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. शेतकऱ्यांनो, पावसामध्ये जनावरसह शेतीची अशी घ्या काळजी, या पिकांची करा पेरणी, VIDEO बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठाच नाही बीड जिल्ह्यातील कोल्हापुरी पद्धतीच्या 13 बंधाऱ्यांवर शेती क्षेत्र अवलंबून आहे. आता खडकत 1, खडकत -2, सांगवी संगमेश्वर, सांगवी नागापूर, टाकळसिंग, पिंपरी घुमरी, हिंगणी, धिडर्डी, कडा, पिंपळसुट्टी नाथापूर व कुक्कडगाव या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांतील पाणीसाठा 19,792 दलघमी असून 4272 हेक्टरवर सिंचन क्षेत्र आहे. आता बंधाऱ्यांत पाणीच नसल्याने अडचणीत भर पडली आहे. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे.