बीड, 5 मे: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) रोखण्यासाठी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच घराबाहेर पडण्याची सूट देण्यात आली आहे. तसेच भाजीपाला आणि इतर गोष्टींसाठी शासनाने वेळ ठरवून दिली आहे. मात्र, असे असताना बीड जिल्ह्यात (Beed district) एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. कर्तव्यावर चाललेल्या एका डॉक्टरलाच पोलिसांनी अमानुष मारहाण (Police beaten doctor) केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात तीन दिवस कडक लॉकडाऊन (Lockdown in Beed) जाहीर केला आहे. त्यामुळे पोलीस सुद्धा या लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. मात्र, बीड जिल्ह्यात पोलिसांनी चक्क वैद्यकीय अधिकाऱ्यालाच मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल वनवे (वैद्यकीय अधिकारी, गट अ) यांना मारहाण करण्यात आली असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.
— News18Lokmat (@News18lokmat) May 5, 2021
वाचा: कोरोना संकटात नागरिकांची लूट; उपचाराच्या नावाखाली लाटले 3.50 लाख, उपचाराविना रुग्णाचा मृत्यू
डॉ. विशाल वनवे हे टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. ते आपल्या ड्युटीवर जात असताना चऱ्हाटा फाटा येथे पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी डॉ. विशाल वनवे यांनी आपलं ओळखपत्र सुद्धा पोलिसांना दाखवलं मात्र, तरिही पोलिसांनी त्यांना अमानुष अशी मारहाण केली आहे. ओळखपत्र दाखवून सुद्धा पोलिसांनी दखल न घेता मारहाण केली आहे.
निषेधार्थ डॉक्टरांचे कामबंद
या घटनेनंतर आष्टी तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. तसेच संबंधीत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही होत नाही तोपर्यंत आष्टी तालुक्यातील सर्व. प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकारी कामबंद आंदोलन करणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Maharashtra police