मुंबई, 23 जानेवारी : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांचं तैलचित्र लावण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विरोधीपक्षनेते अजित पवार, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, केंद्रीय मंत्री नारायण राणे तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह दिग्गजांनी या तैलचित्र अनावरणाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.
चित्रकार चंद्रकला कदम यांनी मात्र हे तैलचित्र ऐनवेळी बदलल्यामुळे नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या चित्रकारितेच्या कौशल्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे मला देशाच्या संसदेत आणि गुजरात विधानभवनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं तैलचित्र काढण्याची संधी मिळाली. बाळासाहेबांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गुजरात विधानभवनात सावरकरांचं तैलचित्र काढण्यासाठी माझ्या नावाची शिफारस केली होती, असं चंद्रकला कदम म्हणाल्या.
मी महाराष्ट्राच्या विधानभवनात सहा तैलचित्र काढली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र काढण्याची सरकारी ऑर्डर मला मिळाली, असं असताना हे चित्र बदलण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे यांनी एका चित्रकाराच्या दृष्टीकोनातून जो विश्वास माझ्यावर टाकला, त्या विश्वासाचा तुम्ही अपमान करू नये, अशी प्रतिक्रिया चित्रकार चंद्रकला कदम यांनी दिली.
विधानभवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण, पण चित्रकार चंद्रकला कदम नाराज#BalasahebThackeray #Shivsena pic.twitter.com/cbeySTBPQt
— News18Lokmat (@News18lokmat) January 23, 2023
विधानभवनातून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकला कदम यांचं चित्र मुख्यमंत्री दालनात लावलं जाणार आहे. चित्रकार किशोर नादावडेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं काढलेलं तैलचित्र विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये लावण्यात येणार आहे, त्यावरूनच चंद्रकला कदम यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Balasaheb Thackeray, Shivsena