सुशील राऊत, प्रतिनिधी औरंगाबाद , 14 फेब्रुवारी : फेब्रुवारी महिना हा प्रेमाची भावना व्यक्त करण्याचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यांमध्ये अनेक जण प्रेमाची भावना व्यक्त करत असतात. याचाच प्रत्यय औरंगाबाद मध्ये आला आहे. पत्नीने आपल्या आयुष्याची पर्वा न करता एचआयव्हीबाधित पतीला किडनी दान करत पती वरील प्रेम दाखवून दिलं आहे. विशेष म्हणजे तीसुद्धा एचआयव्हीबाधित असून वेगवेगळ्या रक्तगटांच्या संक्रमित व्यक्तींचे किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. ही यशस्वी किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया औरंगाबाद शहरातील मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये पार पडली. मराठवाड्यातील 48 वर्षीय रहिवासी रुग्ण कापूस व्यापारी आहेत. 2008 मध्ये ते एचआयव्हीबाधित असल्याचे समाेर आले. त्यांच्यावर अँटिरेट्रोव्हायरल थेरपी सुरू करण्यात आली. 2019 मध्ये उच्चरक्तदाबामुळे मूत्रपिंड निकामी झाल्याने गेल्या तीन वर्षापासून त्यांच्यावर होम डायलेसिस वरती उपचार सुरू होते. दरम्यानच्या परिस्थितीमध्ये त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. यामुळे त्यांची किडनी प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.
Love Story : जोडीदाराचे डोळे जाणार हे माहिती असूनही ‘त्यांनी’ केलं लग्न! Video
पत्नीने किडनी प्रत्यारोपणासाठी होकार दिला याबाबत कुटुंबीयांशी चर्चा करण्यात आली. पतीचा जीव वाचवण्यासाठी पत्नीने किडनी प्रत्यारोपणासाठी होकार दिला. यावेळी पत्नीचा रक्तगट ए पॉझिटिव्ह व पतीचा बी पॉझिटिव्ह होता. दाता आणि रूग्ण अशा दोघांच्याही पात्रतेची पुष्टी केल्यानंतर, आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या. औरंगाबाद येथील जिल्हा प्राधिकरणाकडून परवानगी घेऊन किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नियमांचे पालन करून पूर्ण करण्यात आली, असं मेडिकव्हर हॉस्पिटलचे सल्लागार इंटरव्हेंशन नेफरोलॉजिस्ट डॉक्टर सचिन सोनी यांनी सांगितलं. जगातील पहिली शस्त्रक्रिया किडनी घेनारा आणि किडनी देणारा दोघेही एचआयव्ही बाधित होते. सोबतच त्यांच्या रक्तगटातही विसंगती असताना त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया जगातील पहिली शस्त्रक्रिया आहे. यामुळे या प्रकरणाचा अहवाल आंतरराष्ट्रीय जनरल मध्ये प्रकाशित करणार असल्याची माहिती डॉक्टर सचिन सोनी यांनी दिली.