औरंगाबाद, 24 डिसेंबर : ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन विकास महामंडळ पर्यटकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये विशेष सूट देण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांनी या सुविधा आणि सवलतीचा लाभ घ्यावा, असं आवाहन पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे. औरंगाबाद जिल्हा हा पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखला जातो. बिबीका मकबरा, अजिंठा वेरूळ लेणी यासह जगाच्या नकाशावर असलेले विविध पर्यटन स्थळ औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामुळे या ठिकाणी देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. कोरोनाचे दोन वर्ष निर्बंध असल्यामुळे पर्यटक येऊ शकले नाही. मात्र, निर्बंध उठल्यानंतर आता पर्यटक शहरामध्ये मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांना सवलत देण्यात आली आहे. ख्रिसमसनिमित्त घरीच बनवा स्वादिष्ट डोनट, भन्नाट रेसिपीचा पाहा Video काय आहेत सुविधा? औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांची सोय व्हावी यासाठी पर्यटन विकास महामंडळाने जेष्ठ नागरिकांसाठी 20 टक्के, शासकिय – कर्मचारी यांना आगाऊ आरक्षणासाठी 10 ते 20 टक्के सवलत दिली आहे. आजी – माजी सैनिक आणि दिव्यांगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. समूह आरक्षणासाठी 20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत. ही बुकिंग ऑनलाईन पद्धतीने https://www.mtdc.co/en/ या वेबसाईटवर करता येणार आहे, असं दीपक हरणे यांनी सांगितले. पर्यटकांना पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहिती, आसपासच्या निसर्गाची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची माहीती वेबसाईट, फेसबुक आणि व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येत आहे, असंही दीपक हरणे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.