अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 08 फेब्रवारी : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर औरंगाबादेत दगडफेक झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पण, आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक झालीच नाही अशी माहिती औरंगाबाद पोलिसांनी दिली आहे. आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या शिवसंवाद यात्रेमध्ये मंगळवारी रात्री राडा झाला, महालगाव इथं त्यांची सभा झाली. दरम्यान सभा संपल्यावर त्यांचा ताफा निघाला असताना काही प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यात एक माध्यम प्रतिनिधी किरकोळ जखमी झाला आहे. परंतु, जसा दावा करण्यात आला आहे की, दगडफेक करण्यात आली आहे, तसे काहीही झालेलं नाही, तसेच सभेत किंवा आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर एकही दगड फेकण्यात आल्याची कोणतेही घटना घडली नसल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी दिली. काय झाला राडा? रमाई जयंती असल्यामुळे गावात पूर्वनियोजित मिरवणूक होती. मिरवणूक आणि सभा एकाच वेळी एकाच ठिकाणी आल्याने हा गोंधळ निर्माण झाला. सभास्थळी स्टेज मागून मिरवणूक जात होती, तेव्हा डीजेचा आवाज कमी करायला लावल्याने मिरवणुकीतील कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली.
आदित्य ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेत राडा, मिरवणुकीतला डीजे थांबवल्यामुळे कार्यकर्ते संतप्त#AadityaThackeray #Shivsena pic.twitter.com/la2MgCeojR
— News18Lokmat (@News18lokmat) February 7, 2023
आदित्य ठाकरे यांनी पूर्ण सुरक्षा यंत्रणेमध्ये भाषण उरकलं. सभा संपल्यानंतर गाडीत बसून जातानाही मिरवणुकीतल्या संतप्त कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरेंना अडवण्याचा प्रयत्न केला. तसंच संतप्त कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर ठोसे मारले. मात्र मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांना गावाच्या बाहेर नेण्यात आलं. आदित्य ठाकरे गेल्यानंतरही बराच वेळ गावात गोंधळ सुरू होता. आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर प्लास्टिकचे दोन पाईप फेकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या राड्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘एकमेकांना समजून घ्यावं लागतं. काही कारणास्तव डीजे बंद झाला असेल, मी त्यांची माफी मागितली. शिवशक्ती भीमशक्ती आज एक आहे, आम्ही संविधानासाठी लढत आहोत. काही अडचण झाली असेल तर माफी मागतो. डीजे बंद झाला असेल 5-10 मिनीटांसाठी, मी माईकवरूनही डीजे चालू द्या, म्हणून सांगितलं,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.