औरंगाबाद, 5 जानेवारी : मुलांनी कोणताही खेळ खेळण्यासाठी त्यांना घरातून भक्कम पाठिंब्याची गरज असते. खेळाडूंच्या यशात घरातून मिळणारा पाठिंबा हा महत्त्वाचा फॅक्टर असतो. आई-वडिलांच्या कोचिंगखाली खेळाडूंनी स्पर्धा जिंकल्याची अनेक उदाहरणं आहेत. पण, एखाद्या स्पर्धेत एकाच कुटुंबातील तीन जणांनी मेडल जिंकण्याचा योग अगदी क्वचित येतो. औरंगाबादच्या बाशा कुटुंबीयांनी हा दुर्मिळ प्रकार साध्य केलाय.
जळगावमध्ये नुकत्याच झालेल्या दुसऱ्या खान्देश स्पर्धेत बाशा कुटुंबातील तिघांनी मेडल जिंकलं आहे. मदन बाशा आणि मीरा बाशा हे पती-पत्नी आणि व्रज बाशा या त्यांच्या मुलानं या स्पर्धेत मेडलची कमाई केलीय. बाशा कुटुंबीयांनी तिघांनी मिळून तब्बल 6 मेडलची कमाई केलीय. त्यांचे हे घवघवीत यश सध्या औरंगाबाद शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
20 व्या वर्षानंतर सराव
औरंगाबाद शहरातील सुपारी हनुमान मंदिर परिसरामध्ये असलेल्या खाराकुवा भागामध्ये बाशा कुटुंबीय राहते. मदन बाशा हे शिक्षक असून मीरा बाशा या वकील आहेत. मदन यांनी वयाच्या साधारण 24 व्या वर्षी मित्रांच्या आग्रहातून पोहण्याचा सराव सुरू केला. त्यानंतर त्यांना विविध स्पर्धेत विजय मिळाला. लग्नानंतर त्यांनी मीरा यांनाही पोहायला शिकवलं. पुढं मुलांही पोहण्याचे धडे दिले. सध्याची तरुण पिढी मोबाईल, टीव्ही यांच्या जाळ्यात अडकलीय. मुलांना आपण खेळण्याची सवय लावाली पाहिजे असं मदन यांना वाटतं.
100 स्पर्धा परीक्षा देऊनही मिळालं अपयश, लाडाच्या कुल्फीतून करतोय लाखोंची कमाई! Video
कोणत्या प्रकारात मेडल?
मदन यांनी 50 ते 54 वयोगटातील 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक, 50 मीटर बटरफ्लाय आणि फ्री स्टाईलमध्ये गोल्ड मेडल जिंकले. त्यांच्या पत्नी मीरा यांनी महिलांच्या 50 ते 54 वयोगटात 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक आणि 50 मीटर बॅकस्ट्रोक गटात गोल्ड मेडलची कमाई केली. तर त्यांचा मुलगा व्रजने 17 वर्षाच्या वयोगटातील ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात ब्रॉन्झ मेडल पटकावले.
'औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ उद्यानामध्ये मी फिरायला जात असे. त्यावेळी मला मित्रांनी स्विमिंग करायला शिकवलं. मला स्विमिंगची आवड निर्माण झाली. त्यानंतर कुटुंबीयांनाही मी ते शिकवले. नियमित पोहण्याचे अनेक फायदे मला झाले आहेत', असं मदन बाशा यांनी सांगितले.
'लग्नापूर्वी मला स्विमिंगचा गंध नव्हता. मला नवऱ्यानं स्विमिंग शिकवले. वकिली सांभाळून स्विमिंगचा सराव करणे ही तारेवरची कसरत आहे. पण, याचा मला शारीरिक आणि मानसिक फायदा होत असल्यानं मी नियमित सराव करते. या स्पर्धेत आम्हाला तिघांनाही मेडल मिळेल, हा विश्वास होता. तो प्रत्यक्षात उतरल्यानं खूप आनंद झाला,' असं मीरा यांनी सांगितलं.
'आम्ही नियमित स्विमिंग करतो. एकाला कंटाळा आला तर घरातील दुसरा सदस्य त्याला आग्रह करतो. त्यामुळे सरावात कधी खंड पडत नाही. जळगावमध्ये झालेल्या स्पर्धेत तिघांनीही मेडल मिळवल्यानं आम्हाला आनंद होत आहे. भविष्यामध्ये इंटरनॅशनल स्पर्धेत मेडल मिळवण्याचं ध्येय आहे,' अशी भावना व्रज याने व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Local18, Sports