नागपूर, 03 जानेवारी : स्पर्धा परीक्षेची तयारी करून शासकीय नोकरी मिळवावी हे स्वप्न कित्येकांचं असतं त्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. मात्र, शासकीय नोकरी सगळ्यांनाच मिळते असे नाही. या प्रवासात काहींच्या वाट्याला अपयश हाती येत असतं तर काही सारखे अपयश आल्याने मध्येच हा मार्ग सोडून हतबल होत नैराश्याकडे वळतात. नागपूरच्या निकेश जांभुळकरने 100 स्पर्धा परीक्षा दिल्या मात्र, यश न आल्याने खचून न जाता एक नवा व्यवसाय थाटला. आता यातून तो लाखोंची कमाई करत आहे.
निकेशने नागपुरातील विसिए स्टेडियम जवळ कुल्फी चे दुकान सुरू केले असून त्यातून इतरांना रोजगार निर्माण झाला आहे. बारावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर माझा कल हा स्पर्धा परीक्षांची तयारी करून शासकीय नोकरी मिळवण्यासाठीचा होता. त्यासाठी मी प्रामाणिकपणे अभ्यास देखील करत होतो. दरम्यानच्या काळात मला काही कारणास्तव पुढचे शिक्षण घेणे शक्य नसल्याने मी जॉब आणि उर्वरित शिक्षण मुक्त विद्यापीठातून पूर्ण केलं.
नियमितपणे फावल्या वेळात मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतच होतो. दोनतीन वर्षात मी सातत्याने शंभरहून अधिक स्पर्धा परीक्षा दिल्या. मात्र काही अंतरावर असून देखील मला यश काही मिळाले नाही. काही वेळा क्षणिक नैराश्य देखील माझ्या मनात येत होतं.
सकारात्मक दृष्टीकोन व्यवसायाला सुरुवात
नैराश्य दूर सारून सकारात्मक दृष्टीकोन ठेवून समोर गेलो. कदाचित माझ्यासाठी नोकरी नाही, किंवा मी नोकरीसाठी नाही हा मनात विचार करून मी व्यवसाय क्षेत्राकडे वळलो. जॉब करता करता आपण देखील व्यवसाय करू शकतो हा एक विश्वास मनात तयार झाल्याने मी ही व्यवसाय क्षेत्रात आपले नशीब आजमावण्यासाठी एक धाडस केलं. सुरुवातीच्या काळात मी कॉन्ट्रॅक्टशिप पासून सुरुवात केली. त्यात काही अंशी यश आल्याने आपण देखील इतरांना रोजगार निर्माण करून देऊ शकतो हा विश्वास आला. इथून अनेक गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या अनेक संघर्ष, जीवनातले चढउतार मी अनुभवले व त्यातून माझा प्रवास सुरू राहिला.
लाडाची कुल्फी
कामानिमित्त मी पुण्यात असताना मला लाडाची कुल्फी बद्दल माहिती मिळाली आणि हा व्यवसाय आपण नागपुरात सुरू करू शकतो या उद्देशाने मी अनेक प्रयत्न सुरू ठेवले. मधल्या काळात लॉकडाऊन आणि करोना काळात अनेक आर्थिक अडचणी समोर आल्याने प्रत्येक गोष्टीची जुळवाजुळव करणे मला अवघड गेले. मात्र त्यावरही मी मार्ग काढून धीराने समोर गेलो. जिद्द, संयम आणि सातत्य याच्या भरोशावर मी नागपुरात प्रथम लाडाची कुल्फी या व्यवसायाला सुरुवात केली. नागपुरातील व्हीसीए स्टेडियम जवळ या नागपुरातील पहिल्या आऊटलेटची मी सुरुवात केली आहे.
Video : आता तुमच्या दारात येणार सलून व्हॅन, पुणेकर मायलेकींची भन्नाट आयडिया
इतरांनाही दिलाय रोजगार
बघायला गेलं तर नागपुरात कुल्फीचा कुठलीही ब्रँड अथवा आऊटलेट नाही. त्यामुळे मी पहिले कुल्फीच्या आऊटलेट येथे सुरू केले आहे. आमच्या इथे एकूण बारा प्रकारचे फ्लेवर असून कुल्फी व आईस्क्रीम या दोन्ही स्वरूपात आहे. प्रामुख्याने नागपुरातील प्रख्यात सत्रांपासून तयार केलेली ऑरेंज कुल्फी व आईस्क्रीम ही आमची वैशिष्ट्य आहे. नागपूरकर मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद देत असून त्यातून अनेकांना रोजगार निर्माण करून देत आहोत. त्यासाठी विशेष गाडी तयार केली आहे, अशी माहिती निकेश जांभूळकर यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local Food, Local18, Nagpur