औरंगाबाद, 27 ऑगस्ट : शिवसेनेतून शिंदे गट वेगळा झाल्यापासून छोट्या छोट्या गोष्टीवरुन वादाची ठिणगी पडत असल्याचं दिसून येत आहे. पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या गेटसमोरील घोषणाबाजीतून आपल्याला याची झलक पाहायला मिळाली. येत्या काळातही जर हिच परिस्थिती राहिली तर वाद अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. औरंगाबाद येथील कार्यक्रमात अशीच एक घटना घडली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गणेशोत्सवापूर्वी समन्वय बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा आधी सत्कार करण्यात आला. मात्र हे पाहिल्यावर मंचावर उपस्थित असलेले शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट चांगलेच संतापले. ते थेट खुर्चीवरून उठले. यावेळी त्यांच्या शेजारी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील बसले होते. त्यांनी हाताला धरून शिरसाटांना रोखलं. यानंतर शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला. ट्विटनंतर आता बॅनरवरही झळकली नाराजी; संजय शिरसाटांचं नक्की चाललंय काय? यावेळी कार्यक्रमातील एक फोटोदेखील समोर आला असून यात जलील हे शिरसाटांना थांबवत असल्याचं दिसत आहे. संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित या बैठकीत सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात येत होते. सध्याचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नंतर शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे स्वागतासाठी नाव पुकारण्यात आले. खैरेंच नाव ऐकताच शिरसाट संतापले आणि खुर्चीवर उठून उभे राहिले. हे प्रोटोकॉलला धरून नसल्याचं त्यांनी सांगितलं. आणि आधी माझा सत्कार करायला हवा असंही त्यांनी सुचवलं. असं म्हणत ते मंच सोडून जाणार होते, त्यावेळी जलील यांनी त्यांचा हात धरून रोखलं आणि यानंतर त्यांचा सत्कार झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.