औरंगाबाद, 18 ऑक्टोबर : अधिकाऱ्यांसमोर व्यथा मांडण्यापेक्षा ती जर एखाद्या मंत्र्यासमोर मांडली तर काम लगेच होण्याची शक्यता जास्त असते. मात्र, एखाद्या मंत्र्यालाच याचा फटका बसला तर काम शून्य मिनिटांत होते. याचा प्रत्यय औरंगाबाद येथील शासकीय दंत महाविद्यालयाला आहे. या विषयाची चर्चा राज्यभर गाजत आहे. याला कारण ठरले आहेत औरंगाबाद जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री संदीपान भुमरे.
काय आहे प्रकरण?
संदीपान भुमरे यांनी रविवारी औरंगाबाद येथील शासकीय कार्यालयांना भेट देत आढावा घेतला. यावेळी त्यांनी शासकीय दंत महाविद्यालयालाही भेट दिली. यावेळी डॉक्टरांशी बोलत असताना संदीपान भुमरे यांनी आपल्या दाताच्या समस्येबद्दल सांगितले. तेव्हा उपस्थित डॉक्टरांनी संदीपान भुमरे यांच्यावर लगेच उपचार करण्याची तयारी दाखवली. मग भुमरे यांनीही दौऱ्यातून वेळ काढून दाताच्या दुखण्यावर उपचार करण्याचा निर्णय घेतला. यावेळी संदीपान भुमरे यांच्या दातांचा एक्सरे काढून त्यांच्या दाताचं रुट कॅनॉल सुरु होते. नेमकी तेव्हाच रुग्णालयातील बत्ती गुल झाली. त्यामुळे संदीपान भुमरे यांचे रुट कॅनॉल सुरु असलेल्या कक्षात अंधार पडला. त्यामुळे डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाची तारांबळ उडाली. अखेर सर्वांना आपापले मोबाईल टॉर्च सुरु करुन त्याच्या प्रकाशात संदीपान भुमरे यांच्या दातांचे रुट कॅनलिंग पूर्ण केले.
वाचा - 'तुम्ही नाच्याचं काम चांगलं करता, तेच करा'; भाजप नेत्या चित्रा वाघ यांची जीभ घसरली!
जनरेटची मागणी तत्काळ पूर्ण
एरवी शासकीय रुग्णालयात सामान्य नागरिकांना अशाप्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागणे, ही काही नवीन बाब नाही. औरंगाबाद शासकीय दंत महाविद्यालयाकडून गेल्या पाच वर्षांपासून जनरेटर उपलब्ध करुन देण्याची मागणी केली जात होती. मात्र, प्रशासनाने या मागणीकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. परंतु, पालकमंत्र्यांवरच उपचार सुरु असताना लाईट गेल्याने जनरेटरची निकड प्रशासनाच्या लक्षात आली. त्यामुळे भुमरे यांनी जागच्या जागी औरंगाबाद शासकीय दंत महाविद्यालयाच्या जनरेटरसह इतर मागण्यांना मंजुरी दिली.
आता इतर समस्याही सोडवा : खासदार इम्तियाज जलील
पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या दातांवर उपचार करताना लाईट गेली, हा विषय दुसऱ्या दिवशी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महत्वाचा ठरला. परिणामी या मागणीला लगेच मंजुरी दिली. घाटी रुग्णालयात अनेक समस्यांचा सामना रुग्ण आणि डॉक्टरांना करावा लागतो. त्याकडे पालकमंत्री लक्ष देतील का? असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Private hospitals