औरंगाबाद, 2 जानेवारी : भाजपने 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. याचाच भाग म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी नड्डा यांनी चंद्रपूर आणि औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली. नड्डा यांच्या या दौऱ्यात पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबत चर्चा रंगल्या. जेपी नड्डा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातल्या कार्यक्रम पत्रिकेवर पंकजा मुंडे यांचं नाव नव्हतं, तसंच औरंगाबाद दौऱ्यात पंकजा मुंडे यांनी फक्त 30 सेकंद भाषण केलं, त्यामुळे या चर्चांना उधाण आलं. पंकजा मुंडेंचं 30 सेकंदांचं भाषण जेपी नड्डा यांच्या औरंगाबादमधल्या सभेला उशीर झाला म्हणून पंकजा मुंडे यांना 2 मिनिटांचा वेळ देण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्षांना जास्त वेळ मिळावा म्हणून पंकजा मुंडे यांनी अत्यंत छोटं भाषण केलं. पक्षाचे आदेश मानणं हे माझ्यावरचे संस्कार आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. या भाषणात पंकजा मुंडे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या, तसंच भाजपला जिंकवून देण्याचं आवाहन करत भाषण संपवलं. काय म्हणाल्या पंकजा मुंडे? या भाषणानंतर पंकजा मुंडे यांनी नाराजीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझं नाव निमंत्रण पत्रिकेत असण्याचं कारण नाही, कारण हा लोकसभा मतदारसंघ माझा नाही, म्हणून मी नाराज आहे म्हणणं चुकीचं आहे. मला कमी वेळ दिला असं म्हणणंही चुकीचं आहे, कारण वेळ कमी होता आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचं भाषण महत्तावचं होतं,’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या. ‘गोपीनाथ मुंडे होते त्यावेळीही आणि त्यांच्यानंतरही माझा संघर्ष सुरूच आहे. संघर्षातून शिकायला मिळतं, सध्या राज्याच्या राजकारणात जे सुरू आहे, त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम तयार होतो. लोकांमध्ये दुफळी निर्माण होते. महापुरुषांबद्दल बोलणं टाळलं पाहिजे. सर्वच महापुरुषांच्या नशिबी संघर्ष होता,’ असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं.
पंकजांची विधानसभेची तयारी ‘मी राज्याच्या राजकारणातच सक्रीय आहे. विधानसभेची तयारी सुद्धा मी करत आहे. येणाऱ्या निवडणुका नेत्यांसाठी सोप्या आणि मतदारांसाठी अवघड आहेत,’ असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपण राज्यातच सक्रीय राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.