Home /News /maharashtra /

औरंगाबादकरांनो ही संधी सोडू नका! म्हाडातर्फे घरं आणि भूखंड वितरणासाठी सोडत जाहीर

औरंगाबादकरांनो ही संधी सोडू नका! म्हाडातर्फे घरं आणि भूखंड वितरणासाठी सोडत जाहीर

कोरोना आणि तत्सम ताळेबंदीच्या कालावधीनंतर गेल्या दोन वर्षांत म्हाडाच्या माध्यमातून राज्यातील विभागीय मंडळांतर्गत अद्यापपर्यंत 31935 सदनिकांच्या सोडती काढण्यात आल्या आहेत.

  मुंबई, 24 जून : खासगी घरे विकली जात नाहीत, अशी परिस्थिती असताना म्हाडाच्या औरंगाबाद मंडळाच्या (Aurangabad Mhada) 1204 सदनिका आणि भूखंडांकरिता 11 हजार अर्जदारांचा मिळालेला प्रतिसाद म्हणजे नागरिकांची म्हाडाच्या कार्यप्रणालीवरील विश्वासार्हता सिद्ध करते आणि या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Minister Jitendra Awdhad) यांनी आज केले. म्हाडाच्या औरंगाबाद गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे (Mhada) औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांतील विविध गृहप्रकल्पांतर्गत 984 निवासी सदनिका व 220 भूखंडांच्या वितरणाकरिता संगणकीय सोडत काढण्याचा कार्यक्रम गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या ठाणे येथील नाद या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची ऑनलाईन संगणकीय सोडतीला दुपारी 1 वाजता राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते संगणकावर क्लिक करून सुरवात करण्यात आली. सोडत प्रक्रियेत सहभागी अर्जदारांकरिता औरंगाबाद येथील मराठवाडा महसूल प्रबोधिनी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सोडतीचे वेबकास्ट प्रणालीद्वारे थेट प्रक्षेपणाची देखील सोय उपलब्ध करून देण्यात आली. प्रतीक्षा यादी न काढण्याचा निर्णय -  याप्रसंगी बोलताना मंत्री आव्हाड म्हणाले, कोरोना आणि तत्सम ताळेबंदीच्या कालावधीनंतर गेल्या दोन वर्षांत म्हाडाच्या माध्यमातून राज्यातील विभागीय मंडळांतर्गत अद्यापपर्यंत 31935 सदनिकांच्या सोडती काढण्यात आल्या आहेत. म्हाडाच्या संगणकीय सोडत प्रणालीवर नागरिकांचा प्रचंड विश्वास आहे. ही सोडत प्रणाली अधिकाधिक पारदर्शक करून लोकांना मदत करणारे कायदे करण्यावर प्रशासनाची कायम भूमिका राहिली आहे. म्हणूनच यंदाच्या सोडतीपासून यशस्वी अर्जदारांसह जाहीर करण्यात येणारी प्रतीक्षा यादी न काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. अशाप्रकारे सोडतीतील पात्र न ठरलेल्या अर्जदारांच्या सदनिका पुढे येणाऱ्या सदनिका विक्री सोडतीच्या जाहिरातीत समाविष्ट करण्यात येतील, अशी माहितीही मंत्री आव्हाड यांनी यावेळी दिली. वर्षानुवर्ष प्रतीक्षा यादीवरील घर रिकामी पडून राहतात, त्यामुळे म्हाडाचे आर्थिक नुकसान होत असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका आज काढण्यात आलेल्या संगणकीय सोडतीत प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील 338 सदनिका आहेत. यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे.
  • लातूर एमआयडीसी येथे 314 सदनिका, सिरसवाडी रोड, जालना येथे 18 सदनिका,
  • औरंगाबाद येथील नक्षत्रवाडी येथे 6 सदनिकांचा समावेश आहे.
  • म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी भोकरदन (जि. जालना) येथे 27 भूखंड व 2 सदनिका, अंबड (जि. जालना) येथे 6 सदनिका, सिरसवाडी रोड, जालना येथे 38 सदनिकांचा समावेश आहे.
  • मध्यम उत्पन्न गटासाठी सोडतीत भोकरदन (जि. जालना) येथे 9 भूखंड, हिंगोली येथे 16 सदनिका, टोकवाडी (ता. मंठा, जि. जालना) येथे 53 भूखंड, औरंगाबाद येथील गृहनिर्माण भवनाजवळ 4 सदनिका, देवळाई (जि. औरंगाबाद) येथे 2 सदनिका, नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथे 19 भूखंड समाविष्ट आहेत.
  • तसेच 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटासाठी काळे इस्टेट, इटखेडा, ता. जि. औरंगाबाद येथे 31 सदनिका तर देवळाई (जि. औरंगाबाद) येथे 23 सदनिका आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत उच्च उत्पन्न गटासाठी भोकरदन (जि. जालना) येथे 7 भूखंड, टोकवाडी (ता. मंठा, जि. जालना) येथे 1 भूखंड, बन्सीलाल नगर येथे 1 सदनिका उपलब्ध आहेत.
  • तसेच सर्व उत्पन्न गट या गटांतर्गत उत्पन्न मर्यादा शिथिल करण्यात आली असून या गटासाठी पैठण (जि. औरंगाबाद) येथे 21 सदनिका, देवळाई (जि. औरंगाबाद) येथे 39 सदनिका या सोडतीत समाविष्ट आहेत.
  • त्याचबरोबर अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group) भोकरदन (जि. जालना) येथे 9 भूखंड, कन्नड (जि. औरंगाबाद) येथे 6 सदनिका, हिंगोली येथे 35 सदनिका, परभणीतील गंगाखेड रोड येथे 25 सदनिका व 34 भूखंड, उस्मानाबाद एमआयडीसी एरिया येथे 5 सदनिका, चिखलठाणा (औरंगाबाद) येथे 390 सदनिका, सेलू (जि. परभणी) येथे 2 भूखंड, देवळाई (जि. औरंगाबाद) येथे 1 गाळा, नवीन कौठा (जि. नांदेड) येथे 1 सदनिका, नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथे 59 भूखंडांकरिता विक्रीसाठी उपलब्ध होते. सदरील ऑनलाईन जाहिरातीस अनुसरून एकूण 11,314 अर्ज प्राप्त झाले होते.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Jitendra awhad, Mhada 2022

  पुढील बातम्या