औरंगाबाद, 07 डिसेंबर : औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतात कापूस फुटून आहे. लाखमोलाचा कापूस शेतात असल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका पुन्हा चुकायला लागला आहे. कापूस वेचणीसाठी शेतकऱ्यांना मजुरांचा शोध घ्यावा लागत असल्याने, मजुरांअभावी शेत कापसाचे पांढरे रान झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी इतर राज्यातील मजुरांना बोलवायला सुरुवात केली आहे.
का मिळेनात मजूर?
गावामध्ये पूर्वी मजुरी करणारी कुटुंबे शहरांमध्ये येऊन कंपनी आणि इतर ठिकाणी काम करू लागली आहेत. यामुळे गावात मजुरी करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. तसेच तरुण पिढी शहरांमध्ये जाऊन नोकरी किंवा इतर काम करण्यावर भर देत आहेत. यामुळे तरुणांचा देखील शेतीकडील कल कमी झाला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मजुरांची कमतरता भासत आहे. सोबतच एकाच वेळी कापूस वेचणीसाठी आल्यामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झाले आहे.
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, किटकनाशकांपासून संरक्षण करणारी नवीन सिस्टीम तयार, Video
त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आता इतर राज्यातील मजुरांना बोलवायला सुरुवात केली आहे. यासाठी शेतकरी त्यांचा येण्या - जाण्याचा खर्च करत आहेत. तर त्यांना या ठिकाणी 10 रुपये प्रति किलोप्रमाणे कापूस वेचण्यासाठी दिला जात आहे. फुलंब्री तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी या मजुरांच्या मदतीने कापूस वेचणी केली आहे.
इतर राज्यातील मजुरांना बोलून कापूस वेचून घेतला
आमची 20 एकर शेती आहे. यामध्ये सर्वाधिक कापूस लागवड केली आहे. कापूस फुटल्यामुळे वेचणीसाठी मजूर मिळत नव्हते. यामुळे आम्ही इतर राज्यातील मजुरांना बोलून कापूस वेचून घेतला आहे, असं शेतकरी विनोद जाधव यांनी सांगितलं.
निसर्गाशी दोन हात करून अगोदर शेतकरी त्रस्त आहे अशा परिस्थीमुळे शेतातील कापूस निघूनही कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नाही आहेत. शेतातील कापूस वेचणीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे इतर राज्यातील मजुरांना आम्ही पैसे दिले आहेत लवकरच ते आमच्या शेतात येऊन कापूस वेचून देतील, असं शेतकरी अर्जुन वाघ यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Farmer, Local18