जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पैठणहून आधार कार्डचे काम करुन परत येताना बाप-लेकीवर काळाचा घाला; आयशरला दुचाकी धडकल्याने मृत्यू

पैठणहून आधार कार्डचे काम करुन परत येताना बाप-लेकीवर काळाचा घाला; आयशरला दुचाकी धडकल्याने मृत्यू

फोटो - सोशल मीडिया

फोटो - सोशल मीडिया

शाळेच्या कामासाठी आधार कार्डची गरज भासत होती. त्यामुळे सतीश शिंदेंनी आरती व गायत्रीला शाळेतून बोलावून घेतले.

  • -MIN READ Paithan,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

पैठण, 24 ऑगस्ट : आधार कार्डचे काम करून गावाकडे परतणाऱ्या बाप आणि लेकीचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. सतीश शिवाजी शिंदे (वय-43) आणि गायत्री सतीश शिंदे (वय-9, रा. खेर्डा, ता. पैठण), अशी मृत बाप लेकीची नावे आहेत. ही घटना पैठण-पाचोड रस्त्यावरील चारी क्र. 2 जवळ घडली. तर या अपघातात आरती सतीश शिंदे (12) ही मुलगी जखमी झाली आहे. काय आहे संपूर्ण घटना - सतीश शिवाजी शिंदे (रा. खेर्डा, ता. पैठण) यांची दुचाकी ही नादुरुस्त आयशरवर आदळल्याने सोमवारी हा भीषण अपघात झाला. या अपघातातील मुलगी गायत्री सतीश शिंदे हिचा जागीच मृत्यू झाला तर सतीश शिवाजी शिंदे यांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत सतिश शिंदे हे शेतकरी होते. ते आपल्या मुली आरती व गायत्री यांना सोबत घेऊन दुचाकीने (क्र. एमएच 20 ईपी 7050) आधार कार्डाच्या कामासाठी पैठणला गेले होते. शाळेच्या कामासाठी आधार कार्डची गरज भासत होती. त्यामुळे सतीश शिंदेंनी आरती व गायत्रीला शाळेतून बोलावून घेतले. त्यानंतर दोघीना सोबत घेताना त्यांनी कुटुंबियांना आधार नोंदणी करुन लगेच परतो, असे सांगितले होते. तेथील काम आटोपून पुन्हा खेर्डाकडे परत निघाले होते. मात्र, पैठणनजीकच्या चारी (क्र. २) जवळ पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या आयशर (क्र. एमएच १६ ईएफ ८६६१) हा नादुरुस्त झाल्याने चालकाने रस्त्याच्या कडेला उभा केला होता. यावेळी चालक या गाडीची पाहणी करत असतानाच्या दरम्यानच सतीश शिवाजी शिंदे यांच्या भरधाव दुचाकीने आयशरला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत त्यांच्या एका मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर सतीश व आरती शिंदे हे गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर काही जणांनी जखमींना तातडीने पैठणच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करुन सतीश व आरती या दोन्ही गंभीर जखमींना रुग्णवाहिकेतून अधिकच्या उपचारासाठी औरंगाबादला घाटीत हलविले. मात्र, सोमवारी मध्यरात्री सतीश शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्यांची दुसरी मुलगी आरतीवर उपचार सुरू आहेत. हेही वाचा -  संतापजनक! रुग्णालयात असताना स्वच्छतागृहात महिलेची डिलिव्हरी, उस्मानाबादमधील घटना तर या अपघातानंतर आयशर चालक सुनील वायभासे (रा.आष्टी, जि.बीड) याला अटक करण्यात आली आहे. या अपघाताची नोंद पैठण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुधीर ओव्हळ करीत आहेत. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात