अविनाश कानडजे (औरंगाबाद), 24 डिसेंबर : सध्या अचानक कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. कापसाच्या दरात घसरण झाल्यामुळं एका तरुण शेतकऱ्यानं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एकतुनी इथं घडली. विलास दादाराव गोरे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.
विलास गोरे यांनी कापसाला चांगला भाव मिळेल या आशेपोटी दोन एकर क्षेत्रावर कापूस लावला होता. मशागत आणि रासायनिक खतासाठी काही सावकारी कर्ज घेतले होते. डिसेंबर संपत आला तरी कापसाला चांगला भाव मिळाला नाही. त्यामुळं विलास गोरे यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. विलास यांचा विवाह झालेला नव्हता. विलास गोरे यांच्या आत्महत्येनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : मुलीसोबत गैरकृत्य करत होता पती, नकार दिल्याने थेट पत्नीवरच गोळीबार, कोल्हापुरातील घटनेने खळबळ
बीड जिल्ह्यातही अशीच परिस्थिती
बीड जिल्ह्यात कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात पीक कर्जमाफीतील त्रुटी, पीक कर्जवाटपातील दिरंगाई, हमी भाव, उत्पादित मालासाठी बाजारपेठ नसणे या कारणांनी जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. त्यातून कर्जबाजारीपणा व कर्ज फेडण्याच्या चिंतेतून शेतकरी आत्महत्यांच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. याचबरोबर कोरोनाकाळात नुकसानीत गेलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
यंदा जानेवारी ते जून या सहा महिन्यांतील 181 दिवसांत तब्बल 138 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. हाच आकडा मागच्या वर्षीच्या (2021) सहा महिन्यांत 84 होता. म्हणजेच तुलनेने यंदा 54 आत्महत्या अधिक झाल्याचे दिसते. विशेष म्हणजे जून महिन्याच्या 30 दिवसांत जिल्ह्यात 30 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.
हे ही वाचा : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हातोडा आणि ब्लेडने हत्या, अखेर आरोपीला मिळाली आयुष्यभराची शिक्षा
पूर्वी जिल्ह्यातील शेतकरी व मजूर व अप्रशिक्षित सुशिक्षित बेरोजगार कामासाठी मुंबई पुणेसह अन्य ठिकाणी जात. लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यामुळे त्यांनी घेतलेले कर्ज फेडण्याचे किंवा भविष्यातील योजनांचे नियोजन पूर्णत: विस्कटले. बाजारपेठेत अद्यापही उठाव आलेला नाही. आभासी जगणे वाढले आहे. परिणामी सामाजिक कार्यातील सहभाग, लोकांत मिसळणे कमी झाले. कोविड आजारावरील उपचाराचा खर्च, लॉकडाऊनमुळे एकलकोंडेपणामुळे स्वभावात चिडचिडेपणा येऊन सहनशीलता कमी झाली आहे. असे डॉ. मुजाहेद यांनी सांगितले.