जालना, 10 डिसेंबर : जालन्यामधून मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी काँग्रेसच्या वतीनं तक्रार दाखल करण्यात आली आहे. जालन्यातील तालुका पोलीस ठाण्यात चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे जनसामान्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी लाखे यांनी केली आहे. चंद्रकांत पाटलांवर शाईफेक चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून वातावरण चागलंच तापलं आहे. आज ते एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पिपंरी-चिंचवडला गेले असताना त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. शाईफेक करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शाईफेकीनंतर आता चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात काँग्रेसच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. हेही वाचा : Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांचे समर्थक आक्रमक, पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन शाईफेक करणाऱ्यांचे समर्थक आक्रमक चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र यानंतर शाईफेक करणाऱ्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली असून, आधी चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि नंतर आमच्यावर कारवाई करा अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणावरून भाजपाने देखील विरोधकांना इशारा दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.