सुशील राऊत,प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 13 मार्च : मागील आठवड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्याची परिस्थिती असताना, आज पासून जिल्ह्यामध्ये पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे रब्बी पिकांवर संकट निर्माण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. यामुळे होणार पाऊस उत्तर भारतात हिमालय पर्वतरांगांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे. पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. तिकडील अतिशीत वारे, बाष्प आपल्याकडे वाहून येत आहेत. त्यामुळे कमी हवेचा दाब तयार होत आहे. आकाशात ढग जमा होत आहेत. आर्द्रता वाढली आहे. यामुळे उष्ण, शीत, बाष्पयुक्त वाऱ्याचा आकाशात संगम होऊन आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
Beed News: अवकाळी पावसानं आणलं डोळ्यात पाणी, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला! Photos
शेतकऱ्यांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी आज सोमवार पासून जिल्ह्यामध्ये पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. सर्व शेतकरी बांधवांनी काढणी केलेल्या पिकांचा (हरभरा, ज्वारी,गहू,मका,आद्रक,हळद ) ढीग मारून ताडपत्रीने झाकून ठेवावे. तसेच स्थानिक वातावरण बघून काढणी केलेल्या पिकांची मळणी करून धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे. तसेच काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. तसेच पाऊस चालू असताना जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. शेतकऱ्यांनी घाबरू न जाता नियोजन केल्यास त्यांना अडचणी येणार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.