औरंगाबाद, 9 फेब्रुवारी, अविनाश कानडजे : औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टँकर मागे घेताना त्यामधील केमीकल खाली पडून झालेल्या स्फोटात एक घर कोसळले, या घटनेत घरामध्ये असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर त्याचे आई-वडील आणि भाऊ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना शहरातील हर्सूल परिसरातल्या चेतनानगरमध्ये असलेल्या वीटभट्टीजवळ घडली आहे.
टँकर मागे घेत असताना अपघात
घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. हर्सूल परिसरातल्या चेतनानगरमध्ये असलेल्या वीटभट्टीजवळ पवार कुटुंब वास्तव्यास आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास टँकर मागे घेत असताना त्यामधील केमीकल खाली पडले, या केमीकलचा स्फोट झाला. स्फोटाचा हादरा बसल्यानं घर कोसळलं. या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी झाले आहेत. भावनेश नंदू पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. तर नंदू पवार, चंदा पवार आणि योगेश पवार हे या घटनेमध्ये जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
स्फोटामुळे घर हादरले
पवार कुटुंब या परिसरात मजुरीचं काम करायचे, ते विटापासून बनवलेल्या कच्च्या घरात राहत होते. केमिकलच्या स्फोटामुळे या घराला जोरदार हादरा बसला. घर पक्क नसल्यामुळे वीटा आणि पत्रे या मजुरांच्या अंगावर कोसळले. या घटनेत भावनेशला आपला जीव गमवावा लागला आहे, तर त्याचे आई-वडील आणि भाऊ जखमी झाले आहेत, जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Aurangabad News