औरंगाबाद, 16 सप्टेंबर : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्ष उद्या म्हणजेच 17 सप्टेंबरपासून साजरं होत आहे, यानिमित्त वेगेवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, पण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमावरून शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामानिमित्त केंद्र सरकार आणि तेलंगणाने कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे, पण महाराष्ट्र सरकार याबाबत उदासिन असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे. ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासंदर्भात राज्यातील एकनाथ शिंदे सरकारकडून दाखवण्यात येत असलेली उदासीनता, बेफिकीरी आणि अनास्था ही बाब संतापजनक आहे. उद्यापासून (१७ सप्टेंबर ) मराठवाडा-हैदराबाद मुक्ती संग्रामाचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरं होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हैदराबाद येथे भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. तेलंगणा सरकारनं राज्यपातळीवर भव्य नियोजन केलं आहे. मात्र महाराष्ट्रात कुठलीच तयारी दिसत नाही. शिंदे सरकारची ही बेफिकीरी, अनास्था मराठवाडा मुक्तीसंग्रामातील तमाम स्वातंत्र्यसैनिक वीरांचा आणि मराठवाड्यातील जनतेच्या भावनांचा अवमान करणारी आहे’, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. ‘मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारनं स्थापन केलेली मंत्रिमंडळाची उपसमिती शिंदे सरकारनं बरखास्त केली, त्यानंतर नवीन समिती अद्याप नेमलेली नाही. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारनं अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या ७५ कोटी रुपयांपैकी १ रुपयाही शिंदे सरकारनं अद्याप वितरित केलेला नाही. अशा परिस्थितीत मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमहोत्सव साजरा कसा होणार?,’ असा संतप्त सवाल अजित पवार यांनी विचारला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.