औरंगाबाद, 29 नोव्हेंबर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आणि महाविकास आघाडीने सत्ता स्थापन करत भाजपला धक्का दिला. राज्यातील सत्ता गमावल्यानंतर भाजपमधून नेत्यांचं आऊटगोइंग सुरू झालं. भाजपचे बीडचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर आता गायकवाड यांनी भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
'12 वर्ष मी अपमान सहन केला आहे. भाजपमध्ये बहुजनांना संपविण्याचा घाट घातला जात आहे,' असा आरोप करत माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी औरंगाबाद इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
जयसिंगराव गायकवाड यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आज त्यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.
'भाजप पक्षात फक्त मी, मी आणि मीच चालत आहे. पक्षाने माझ्याकडे कोणतीही जबाबदारी दिली नसून सध्या पक्षात दोघांचेच म्हणणे ऐकले जात असून एकनाथ खडसे, विनोद तावडे, आणि दानवे यांना ज्या प्रमाणे वागणूक दिली गेली आणि वागणूक दिली जात आहे त्यामागे पक्षातून बहुजनांना संपविण्याचा घाट सुरू आहे,' असा गंभीर आरोप गायकवाड यांनी केला आहे.
'भाजप आणि RSSलाही रामराम'
'भाजपमध्ये सामूहिक निर्णय प्रक्रिया संपुष्टात आली असून त्यामुळेच मी पक्ष सोडला आहे. मी राजकीय आखड्यातील उत्कृष्ट खेळाडू असून देखील मला खुंट्याला बांधण्यात आले होते. राष्ट्रवादीत मी पणा नाही... सर्वांना घेऊन पुढे जाण्याची वृत्ती आहे. मी 18 वर्षे संघाचा प्रचारक होतो. मात्र आता संघ आणि भाजप दोघांनाही रामराम ठोकला आहे,' असे जयसिंगराव गायकवाड म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.