मुंबई, 22 मे : आर्यन खान प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टाने समीर वानखेडे यांना फटकारलं आहे. शाहरुख खानसोबतचे व्हॉट्सऍप चॅट लीक केल्याप्रकरणी हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. मीडियामध्ये चॅट लीक करण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात का? असा प्रश्न हायकोर्टाने विचारला. आर्यन खान तुरुंगात असताना समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यात व्हॉट्सऍपवर चॅटिंग झालं होतं, हे चॅटिंग मीडियाला लीक करण्यात आलं. समीर वानखेडे हे आर्यन खान ड्रग्स प्रकरणातले मुख्य तपास अधिकारी होते. समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खान प्रकरणात शाहरुख खानकडून खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला असून याची सुनावणी हायकोर्टामध्ये पार पडली. या प्रकरणी समीर वानखेडे तपासात सहकार्य करत नाहीत, तसंच त्यांनीच शाहरुख खान सोबतचे चॅट लीक केले, असा युक्तिवाद सीबीआयच्या वकिलांनी हायकोर्टात केला. दुसरीकडे मुंबई हायकोर्टानं वानखेडेंना दिलासा दिलाय. कोर्टानं वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण दिलंय. वानखेडेंना 8 जूनपर्यत अटकेपासून संरक्षण देण्यात आलंय. यासगळ्यात कोर्टानं काही अटी वानखेडेंसमोर ठेवल्यात. त्यांना यापुढे आर्यन खान प्रकरणाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे व्हाट्स अप चॅट व्हायरल करता येणार नाही. यापूर्वी समीर वानखेडे यांनी बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आणि त्यांच्यातील चॅट व्हायरल केल्याचे सांगण्यात आले होते, त्यावर कोर्टानं त्यांना समज दिली आहे. आर्यन खान प्रकरणामध्ये रविवारी सीबीआयने समीर वानखेडे यांची कसून चौकशी केली होती, यानंतर आज कोर्टामध्ये याप्रकरणाची सुनाावणी झाली. दरम्यान शाहरुखसोबतचे चॅट लीक का केले? याबाबत समीर वानखेडे यांच्या वकिलांनी शुक्रवारीच मीडियासमोर प्रतिक्रिया दिली होती. CBI कडून समीर वानखेडेंची मॅरेथॉन चौकशी; 15 प्रश्नांची यादी समोर, शाहरुखबाबत.. ‘पेटिशनमध्ये समीर वानखेडे यांचे चॅट शाहरुख खान आणि ज्ञानेश्वर सिंग यांच्यासोबत आहेत. आर्यनने जामीन मिळवताना हायकोर्टामध्ये शपथपत्रावर सांगितलं की कोणत्याही विभागीय अधिकाऱ्याविरोधात कोणतीही तक्रार नाही. सोशल मीडियावर समीर वानखेडेंवर राजकीय चिखलफेक सुरू आहे, राजकीय वर्तुळात समीर वानखेडेंवर खोटे आरोप लावले जात आहेत, या आरोपांना आपला पाठिंबा नाही, असंही आर्यनने हायकोर्टामध्ये सांगितलं’, असं समीर वानखेडेंचे वकिल म्हणाले. ‘शाहरुखचे चॅट बघितले तर एक बाप आपल्या मुलासाठी जी विनंती करतो ती त्याने केली आहे. पैशांबाबत काही असतं, तर त्या चॅटमध्ये त्याचा उल्लेख असता. आम्ही इतके पैसे दिले, एवढ्याची डिमांड होती, एवढ्यामध्ये सेटल झालं, असं कोणतंही चॅट कॉनव्हर्सेशन नाही. शाहरुख खान समीर वानखेडेंना प्रामाणिक अधिकारी म्हणत आहे. एक बाप दुसऱ्या बापाला विनंती करत आहे, की माझ्या मुलावर लक्ष ठेव, असं शाहरुख सांगत आहे. माझ्या मुलाची काळजी घ्या, त्याच्याकडून काही चूक झाली असेल तर ती सुधारू, ज्यामुळे त्याचं पुढचं आयुष्य चांगलं होईल, असं शाहरुख म्हणत आहे. याच मार्गावर समीर वानखेडेंचा तपास सुरू होता’, अशी प्रतिक्रिया समीर वानखेडेंच्या वकिलांनी दिली आहे. ‘समीर वानखेडेंवर लावलेले आरोप निराधार आहेत, हे आरोप निराधार आहेत, हे दाखवण्यासाठीच शाहरुख खानची चॅट दाखवण्यात आले’, असा खुलासा समीर वानखेडे यांच्या वकिलांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.