मुंबई, 26 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी घेतली. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या कार्यक्रमात राज ठाकरेंनी जोरदार टोलेबाजी केली. अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे शेजारी असताना अजित पवारांनी डोळा मारला, यावरून अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला. राजकारणात डोळे मारणं आणि टाळी मारणं सुरू आहे. राहुल गांधींनी मोदींजींना मिठ्ठी मारली, अजित पवारांनी उद्धव ठाकरेंकडे माईक दिला आणि डोळा मारला. तुमचा काय प्लॅन आहे, टाळी द्यायचा?, असा प्रश्न अमृता फडणवीस यांनी विचारला. डोळे मारायचा?, ज्या वयात या गोष्टी करायच्या असतील त्या करायच्या असतात. त्यांच्या या गोष्टी वयात राहून गेल्या असतील म्हणून ते असं करत असतील, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
तुम्ही कुणाला साथ देणार? असा प्रश्नही अमृता फडणवीस यांनी विचारला, त्यावरही राज ठाकरेंनी फटकेबाजी केली. ‘महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे कोणासोबत आहे, ते कळत नाही. ते पहाटे गाडी घेऊन जातात. कित्येक वेळा तुम्हाला माहिती नसतं. मग कधी ते शिंदेंसोबत असतात. मग अजितदादांचा चेहरा उतरलेला असतो. कुणाला भेटणं आणि बोलणं ही बातमी झाली आहे. एक राजकारणातला मोकळेपणा होता, तो मीडियाने घालावला आहे. त्यामुळे त्याला आता अर्थ उरला नाही. कुणी कुणाला भेटलं आणि बोललं तर युत्या आणि आघाड्या होत नाही. जोपर्यंत स्वरूप येत नाही, त्यामुळे पुढे काही होत नाही’, असं राज ठाकरे म्हणाले.