मुंबई, 7 ऑगस्ट : जगभरात आज मैत्री दिवस साजरा केला जातोय. मैत्री दिनाचं औचित्य साधून आज जगभरातील नागरीक आपल्या मित्रांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करत आहेत. आपल्या मित्रांना मित्र दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये राजकारणी देखील मागे राहिलेले नाहीत. राजकीय नेतेमंडळींकडूनही एकमेकांना मित्र दिनाचं औचित्य साधत शुभेच्छा दिल्या जात आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात तर सध्या एका वेगळ्या मैत्रीची रंजक कहाणी गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळतेय. ही राजकीय मैत्री जुळून आल्याने वेगळं आणि अनपेक्षित राजकीय समीकरण बघायला मिळतंय. या राजकीय घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मैत्री दिनाचं औचित्य साधत फेसबुकवर खास पोस्ट शेअर केली आहे. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सध्या चांगलीच गट्टी जमली आहे. विशेष म्हणजे गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या सरकार काळात दोन्ही एकमेकांच्या विरोधात होते. शिंदे सरकारमध्ये नगरविकास मंत्री होते. तर फडणवीस विरोधी पक्षनेते होते. पण दोघांनी एकमेकांवर कधीही टोकाची टीका केली नव्हती. शिंदेंचा महाविकास आघाडी सरकारमध्येही दरारा होता. ते शिवसेनेतील नंबर दोनचे मंत्री होते. तर फडणवीस हे भाजपातील राज्यातील नंबर एकचे नेते आहेत. दोन्ही नेत्यांमधील संबंध चांगले होते. त्यातूनच महाविकास आघाडीला धोबीपछाड देवून राज्यात गेल्या महिन्यात मोठा राजकीय भूकंप झाला. या राजकीय भूकंपामागील कारण म्हणजे शिंदे आणि फडणवीस यांच्यातील मैत्रीचे संबंध. हेच संबंध त्यांनी प्रत्यक्ष राजकारणातही अवलंबले आणि राज्याच्या राजकारणात दोन मित्र सत्तेचे बरोबरीचे दावेदार बनले. विशेष म्हणजे देवेंद्र यांनी तर शिंदेंसाठी राज्याच्या सर्वोच्च पदाचा मानही स्वीकारला नाही. शिंदे-फडणवीस यांच्या एकत्र सरकारची मैत्रीची कहाणीदेखील रंजक आहे. या कहाणीचा संपूर्ण महाराष्ट्र साक्षीदार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात या मैत्रीने भूकंप घडवून आणला. याच मैत्रीतून बंडखोर शिवसेनेचा भलामोठा गट फडणवीसांच्या पाठीमागे सरकार स्थापन करण्यासाठी उभा राहू शकला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं समीकरण बघायला मिळालं. शिंदे-फडणवीस यांच्यातील मैत्रीवर अमृता फडणवीस यांनीदेखील भाष्य केलं आहे.
अमृता यांनी फडणवीस आणि शिंदे यांच्या मैत्रीची तुलना थेट ‘शोले’ चित्रपटातील जय आणि विरुच्या जोडीशी केली आहे. “ये दोस्ती हम नही तोडेंगं, महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत”, असं म्हणत अमृता यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

)








