मुंबई, 18 फेब्रुवारी : निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल म्हणजे उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का मानला जात आहे. धनुष्यबाणासह शिवसेना हे नावही एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर काय परिणाम होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान यावर राजकीय प्रतिक्रीया येऊ लागल्या आहेत. नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
घरातला मुलगा हा वडिलांचा वारसा चालवून नाव कमावत असतो. मात्र उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास सोडून बाळासाहेबांची विचार संपविले. हीच विचारधारा एकनाथजी शिंदे हे चालवत असल्याने त्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं असल्याची प्रतिक्रीया अमरावती जिल्ह्याचा खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे.
हे ही वाचा : धनुष्यबाण मिळाल्यानंतर आता शिंदेंचा मोर्चा काँग्रेस, राष्ट्रवादीकडं; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
संजय राऊत काय म्हणाले
संजय राऊत यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगानं परस्पर निर्णय घेतला. मालकी गेल्यानं मालक भिकारी होत नाही. काही लोक सोडून गेले म्हणजे पक्ष कसा जाऊ शकतो. सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाला जाब विचारण्याची वेळ आली असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, सगळे हिशोब इथे खोक्याने चालतात. यंत्रणाचा कळसुत्री बाहुल्याप्रमाणे उपयोग होत आहे. सर्व ताकद शिवसेनेला संपवण्यासाठी वापरली जात आहे. घटना, कायदा, लोकभावना पायदळी तूडवून हा निर्णय घेण्यात आला. लोकशाहीच्या नावाने राजकीय हिंसाचार सुरू आहे. आम्ही कायदेशीर लढाई लढू , मात्र घशात पक्ष घेणाऱ्यांना लवकरच ठसका लागेल असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात रंगत; मविआच्या ‘त्या’ निर्णयानंतर एकनाथ शिंदे भाजपसाठी पुण्यात
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर वेदना झाली मात्र आम्ही खचून गेलो नाहीत. आज निवडणूक घ्या म्हणजे खरी शिवसेना कोणाची आहे ते कळेल, असं आव्हानही त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना केलं आहे. तसचं ही लढाई शिंदे गट आणि शिवसेना अशी नाही तर शिंदे गटामागे जी कोणती महाशक्ती आहे ती आणि शिवेसना अशी आहे, असं म्हणत राऊत यांनी भाजपला देखील टोला लगावला आहे.