मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अमरावती पदवीधर निवडणुकीत 'ऑडिओ बॉम्ब'ने खळबळ! आघाडीचा उमेदवार अडचणीत

अमरावती पदवीधर निवडणुकीत 'ऑडिओ बॉम्ब'ने खळबळ! आघाडीचा उमेदवार अडचणीत

अमरावती पदवीधर निवडणुकीत 'ऑडिओ बॉम्ब'ने खळबळ

अमरावती पदवीधर निवडणुकीत 'ऑडिओ बॉम्ब'ने खळबळ

अमरावती पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. धीरज लिंगाडे यांच्या ऑडिओ क्लिपने खळबळ उडाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अमरावती, 28 जानेवारी : पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीला अवघे दोन दिवस उरले असताना महाविकास आघाडीचा एक उमेदवार अडचणीत आला आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची 'ऑडियो क्लीप' व्हायरल झाली आहे. या क्लिपने चांगलीच खळबळ उडाली. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शरद झांबरे यांच्याशी संवादाची ही ऑडियो क्लीप आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?

ऑडिओमध्ये काँग्रेस संदर्भात धीरज लिंगाडे यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. लिंगाडे यांनी काँग्रेस बोगस असल्याचं यात म्हटलं आहे. लिंगाडे यांनी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी ठाकरे गटातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसनं आपल्या पक्षातील इच्छुकांना डावलत लिंगाडे यांना उमेदवारी दिली. डॉ. रणजीत पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मतदारसंघात कमकुवत उमेदवार देण्यासाठी मॅनेज केल्याच्या आरोपालाही लिंगाडे यांनी दुजोरा दिला. या ऑडियो क्लीपमुळे चांगलीच खळबळ उडाली.

वाचा - नाशिक पदवीधर निवडणुकीत घडामोडींना वेग! सत्यजित तांबे पहिल्यांदाच भाजप नेत्याच्या भेटीला

कोण मारणार बाजी?

अमरावती पदवीधर मतदार संघावर सलग 30 वर्षे ‘नुटा’ या संघटनेचे वर्चस्व होते. 2010 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे डॉ. रणजित पाटील यांनी सलग पाच वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे बी टी देशमुख यांचा पराभव केला. त्‍यानंतर व्‍यावसायिक संघटनांची शक्ती क्षीण होत राजकीय पक्षांचा प्रभाव वाढत गेल्‍याचे चित्र दशकभरात दिसून आले. काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्‍यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष किती परिश्रम घेतात आणि अपक्ष उमेदवारांची मतविभागणी कुणाच्‍या पथ्‍यावर पडणार, याचे आडाखे बांधले जात आहेत. सर्वाधिक 64 हजार 344 मतदार हे अमरावती जिल्‍ह्यात तर त्‍या खालोखाल 50 हजार 606 मतदार हे अकोला जिल्‍ह्यात आहेत. या दोन जिल्‍ह्याचा कौल महत्‍वाचा ठरणार आहे. बुलढाणा जिल्‍ह्यात 37 हजार 894, यवतमाळ जिल्‍ह्यात 35 हजार 278 तर वाशीम जिल्‍ह्यात 18 हजार 50 मतदार आहेत.

भाजपसाठी आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍यासाठी ही निवडणूक प्रतिष्‍ठेची ठरली आहे. गेल्‍या निवडणुकीच्‍या वेळी डॉ. रणजित पाटील हे राज्‍यमंत्री होते. तत्‍कालीन मुख्‍यमंत्र्यांकडील सर्व खाती त्‍यांच्‍याकडे होती. पण, आता त्‍यांच्‍याकडे मंत्रिपद नाही. पक्षसंघटनेवरच त्‍यांची भिस्‍त आहे. दुसरीकडे, सरकारविरोधी मतांची एकजूट करणे हे धीरज लिंगाडे यांचे लक्ष्‍य आहे. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्‍ये थेट लढतीची शक्‍यता वर्तवली जात असतानाच अन्‍य उमेदवारांचे उपद्रवमूल्‍य कुणासाठी नुकसानकारक ठरणार याचे औत्‍सुक्‍य आहे.

First published:

Tags: Nana Patole