रत्नागिरी, 13 फेब्रुवारी : रायगड (Raigad) जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa) सावित्री नदीवरील (Savitri River) ब्रिटिश कालीन पूल 2 ऑगस्ट 2016 रोजी कोसळला होता. या दुर्घटनेत 40 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे या दुर्घटनेची झळ सोसली असतानाही तशाच एका घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती वर्तवली जात आहे. कारण सावित्री नदीवरील आणखी एक पूल हा धोकादायक स्थितीत आहे. या नदीवरील आंबेत-म्हाप्रळ पूल (ambet mhapral bridge) हा कोसळण्याच्या मार्गावर आहे. 12 कोटी खर्च, तरीही पूल कधीही कोसळू शकतो महाडमधील सावित्री नदीवरील दुर्घटनेनंतर याच सावित्री नदीवरील आंबेत-म्हाप्रळ नावाचा आणखी एक पूल धोकादायक बनला आहे. हा पूल वाहतूकीस कमकुवत बनला असून तो कोसळण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे महाड दुर्घटनेनंतर या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होऊन पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. आंबेत पुलाचे काम 6 महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले होते. या पुलासाठी तब्बल 12 कोटी रुपये खर्चून दुरुस्ती करण्यात आली होती. तरीही हा पूल एका बाजूला झुकला आहे. तसेच पुलाचा एक पिलर सरकल्याने हा पूल कमकुवत झालेला असून कधीही कोसळू शकतो, असा दावा केला जात आहे. या पुलावरुन अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. ( ‘Valentine Day’नंतर राज्यात बसरणार पाऊस, 5 जिल्ह्यांना IMD कडून High अलर्ट ) रायगड-रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा आणि मुंबईसाठी जवळचा पर्यायी मार्ग म्हणून महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या कारकीर्दात या पुलाला मंजुरी मिळाली होती. हा पूल सावित्री नदीवर बांधण्यात आला. या पुलामुळे मुबंईचे अंतर कमी होऊन दोन्ही जिल्ह्यातील दळणवळणाची सोय झाली. विशेष म्हणजे 6 महिन्यांपूर्वीच 12 कोटी रुपये खर्च करुन दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु हा पूल वाहतुकीला कमकुवत बनल्याने शासनाचे कोट्यवधी रुपये गेले कुठे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आंबेत-म्हाप्रळ पूल वाहतुकीसाठी बंद महाड सावित्री नदीवर यापूर्वी दुर्दैवी घटना घडून अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले होते. अशाप्रकारची घटना टाळण्यासाठी आंबेत-म्हाप्रळ पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच तज्ज्ञ मंडळींकडून या पुलाचा सर्व्हे करण्यात आला आहे. हा पूल अतिशय धोकादायक बनला आहे. या पुलावर वाहने पेलण्याची क्षमता शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे या पुलाचा पुन्हा सर्व्हे करुन दुरुस्ती केली जाईल. तसेच पर्यायी पूलसुद्धा उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा सुरु आहे, असं खासदार सुनील तटकरे म्हणाले. पिलर हलत असल्याची चर्चा सावित्री नदीवरील आंबेत पुलाची पाहणी केल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे तज्ज्ञ मंडळींच्या लक्षात आले आहे. पुलाचा दोन नंबरचा पिलर भरती ओहोटीच्या वेळी दोन इंच ते 4 इंच सरकत असल्याचे सर्व्हेतून समोर आले आहे. त्यामुळे पूल कधीही कोसळू शकतो, असं बोललं जातं आहे. आंबेत-म्हाप्रळ ब्रिज खाली सक्शन पंपाद्वारे बेकायदेशीर उत्खनन करण्यात आल्याने पिलरचा सपोर्ट कमी झाला आहे. तसेच एक पिलर भरती ओहोटीच्या वेळी जागा सोडत असून, किंचित हालत आहे. संपूर्ण ब्रिज कधीही पडू शकतो. वारंवार तक्रारी करुनसुध्दा दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. स्थानिकांची मोठी गैरसोय सावित्री नदीवरील धोकादायक बनलेला पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असल्याने इतर वाहतूकदार प्रमाणेच स्थानिक स्थानिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. लांबच्या मार्गाने वाहने घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे अंतर-वेळ वाढले आहे. तर दोन्ही जिल्ह्यातील दळणवळण ठप्प झाल्याने स्थानिकांची मोठी गैरसोय होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.