मानेला गुंडाळला गेला 'चायनीज' मांजा, सात वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

मानेला गुंडाळला गेला 'चायनीज' मांजा, सात वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

वेदांत हा धामणगाव रेल्वे शहरात हरिबाई प्राथमिक मराठी शाळेचा पहिलीचा विद्यार्थी होता.

  • Share this:

अमरावती,15 जानेवारी: धामणगाव रेल्वे तालुक्यातील वसाड येथे मकर संक्रातीच्या उत्सवाला गालबोट लागलं आहे. पतंग उडवताना चायना मांजा मानेभोवती गुंडाळला गेल्याने सातवर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वेदांत पद्माकर हेंबाडे (वय-7) असं मृत चिमुकल्याचं नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, वेदांत हा धामणगाव रेल्वे शहरात हरिबाई प्राथमिक मराठी शाळेचा पहिलीचा विद्यार्थी होता. हेंबाडे कुटुंबीय मुलांच्या शिक्षणासाठी धामणगाव रेल्वे शहरात वास्तव्यास असून पाण्याच्या टाकीजवळ भाड्याने राहतात. वेदांत हा पतंग उडवण्याचा हट्ट करीत असल्याने वडिलांनी त्याला पतंग व मांजा आणून दिला. वेदांत गच्चीवर पतंग उडवत असताना त्याच्या मानेला मांजा गुंडाळला गेला. मान कापल्याने गंभीर जखम झाल्यामुळे वेदांतला अमरावती येथे खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले होते. त्याची प्रकृती खालावल्याने रविवारी रात्री त्याला वसाड गावाहून अमरावती येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. मृत वेदांतच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. वेदांत अभ्यासात हुशार होता. मकर संक्राती सणाच्या तोंडावर वेदांतचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने वसाड गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने 1986 पर्यावरण संरक्षण कायदा कलम 5 नुसार मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. बंदी असतानाही बाजारपेठेत चायनीज व नायलॉन मांजाची धडाक्यात विक्री सुरू असल्याने या घातक मांजावरील बंदी ही केवळ कागदावरच ठरत आहे. मकर संक्रांती दरम्यान बाजारपेठेत मांजा व पतंग खरेदीसाठी गर्दी झाली आहे. मात्र पतंगप्रेमींमध्ये चिनी व नायलॉन मांजाची मागणी वाढली आहे. गेल्यावर्षी देखील मांजामुळे अनेक अपघात झाल्यानंतरही यंदा या मांजाची मागणी होत आहे; परंतु हा मांजा नागरिकांसह पशुपक्ष्यांच्या गळ्याचा फास ठरत आहे. नागरिकांना चालताना किंवा वाहन चालवताना जीव मुठीत घेऊ न रस्त्याने जावे लागते. अनेक पक्षी, प्राणी, मनुष्य जखमी किंवा प्रसंगी मृत्युमुखी पडतात.

Published by: Sandip Parolekar
First published: January 15, 2020, 8:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading