अकोला,17 जून : ग्रामीण भागात बळीराजा पेरणी करण्यासाठी आजही बैलांचा वापर करतो. खरिपाच्या हंगामात (Kharif season) पेरणीसाठी लगबग सुरू असताना, बैलबाजार देखील फुलू लागले आहेत. बाजारात मोठ्या प्रमाणात पशुधन खरेदी-विक्री सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सांगळूद येथील आढवडी बैलबाजार (Sanglud weekly Bull market) देखील खरिपाच्या हंगामात चांगलाच भरला आहे. कोरोना महामारीमुळं मागील दोन-अडीच वर्षांपासून बाजार बंद होता. मात्र, कोरोनाचं सावट कमी झाल्याने हा बाजार पुन्हा सुरू झाला आहे. बाजारात बैलांची खरेदी विक्री होऊन लाखो रुपयांची उलाढाल होत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला या बाजारामुळे चालना मिळत आहे.
सांगळूद येथे दर शनिवारी जिल्ह्यातील सर्वात मोठा आठवडी बैलबाजार भरतो. शेतीचे यांत्रिकीकरण वाढलेले असले तरी जिल्ह्यातील अनेक अल्प भूधारक शेतकरी बैलावरचीच शेती करतात. मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने यांत्रिक शेती खर्चिक ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी परत बैलांचा आधार घेत शेतीची कामे करण्यास सुरुवात केली आहे. ज्यांच्याकडे बैलजोडी नाहीये त्यांनी खरिपासंबंधीच्या कामांसाठी बैलजोडी खरेदीकरता बाजाराकडे मोर्चा वळवला आहे.
बैलजोडीला 1 लाख 80 हजारापर्यंचा भाव
खरिपाचा हंगाम सुरू झाला की शेतात पेरणी करण्यासाठी आजही ग्रामीण भागात बैलांचा वापर केला जातो आणि पेरणी करण्यासाठी बैलजोडी महत्वाची असते. मग शेतकरी बैल खरेदी आणि विक्रीसाठी वळतो तो बैल बाजाराकडे. जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातून अनेक शेतकरी सांगळूद येथे आपली बैलजोडी विकायला आणतात. या बाजारात गावठी, खिलार जातींचे बैल खरेदी-विक्री होतात. सुमारे 1 लाख 80 हजारापर्यंचा भाव इथे बैजोडीला मिळतो. बैलांचा रंग, शिंगे,दात आणि बैलांची उंची यावर हे बैलांचे दर ठरत असतात. या बाजारात उच्चप्रतीचे बैलजोड्या आपल्याला पाहायला मिळतील.
हे वाचा - बापरे! या विचित्र जीवाला पाहून सर्वांना फुटला घाम; हा कोण आहे तुम्हाला माहितीये का?
जिल्ह्यातील सर्वात मोठा आठवडी बैलबाजार
अकोल्यापासून सांगळुद हे गाव 12 ते 15 किमी अंतरावर आहे. सागळूद ग्रामपंचायत समोर असलेल्या तीन एकरातील आवारात हा बाजार गेल्या 23 वर्षांपासून बाजार भरतो. बाजारात जिल्हाभरातील शेतकरी खरेदी विक्रीसाठी येतात. जिल्ह्यातील सर्वात मोठा आठवडी बैलबाजार म्हणून या बाजाराची ओळख आहे. गावाकऱ्यांच्या सहकार्याने या बाजाराला मोठे स्वरुप आले आहे . या बाजारात कुठलीही फी किंवा अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत नाहीत.
“गावाकऱ्यांच्या सहकार्याने आम्ही बैलबाजार सुरू केला.”
सांगळूद या गावातील जुने-जाणते गावकरी म्हणतात सांगतात की, "आम्हाला बैलजोड्यांची खरेदी -विक्री करण्यासाठी नेहमी बाहेरगावी किंवा जिल्हाबाहेर जावं लागायचं. त्यामुळे आम्ही गावातच बैलबाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि गावाकऱ्यांच्या सहकार्याने आम्ही बैलबाजार सुरू केला. आता या बाजाराला 23 वर्ष पूर्ण झाली आहेत. नित्यक्रमे हा बाजार आठवड्याच्या शनिवारी भरतो. या बाजारात आता जिल्हा बाहेरील शेतकरी देखील येतात."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola News, Farmer