वाशिम, 26 मार्च : जिल्ह्यातील अकोला-नांदेड महामार्गावर (Akola-Nanded Highway) सायखेडा फाट्यानजीक ट्रक आणि मोटारसायकलची समोरा समोर धडक झाल्याने भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात मोटरसायकलवरील एक जण जागीच ठार झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली.
मोटारसायकलवर दोघे पती पत्नी जात असताना काळाने झडप घातल्यानं पत्नीच्या डोळ्यासमोर पती ट्रकखाली आला आणि त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
सायखेडाफाट्या जवळ वाशिमच्या दिशेकडून येणारी मोटार सायकल आणि नांदेडकडून येणाऱ्या ट्रकचा समोरा समोर अपघात होऊन या अपघातात सेनगाव तालुक्यातील तपोवन येथील विनोद विश्वनाथ मते( वय 48 ) हे जागीच ठार झाले, तर त्यांची पत्नी सिंधुबाई मते ( वय 45 ) ही गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर मोटरसायकल चालक ट्रकच्या चाकाखाली आल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अपघातानंतर जखमी सिंधुबाई यांना वाशिमच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातास कारणीभूत असलेला ट्रक वाशिम ग्रामीण पोलिसांनी जप्त केला असून ट्रकचालकास अटक केली आहे.
सदर दाम्पत्य आपल्या मुलीला उकळी पेन इथं भेटण्यास जात होतं. मात्र वाटेतच ही दुर्घटना घडली.
हेही वाचा - पुण्यात दुचाकीवरून जाणाऱ्या सराफाकडून 9 लाखांचा मुद्देमाल लुटला; लाथ मारून पाडली गाडी
सद्यस्थितीत अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले असून यामध्ये अनेकांचा जीव जात आहे, तर कित्येक जण गंभीर जखमी होत आहेत. भरधाव वाहनांमुळे अनेक अपघात घडत आहेत. कित्येक वाहनचालक वाहन चालवताना वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून निर्धास्तपणे आपले वाहन चालवितात.
वाशिम जिल्ह्यात सर्वत्र महामार्गाचे मोठ्या प्रमाणात कामे झाल्यानं वाहनांचा वेगही वाढला आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात 9 पेक्षा अधिक महामार्गांची कामे पूर्णत्वास आल्यानं वाहनचालक सुसाट वेगाने वाहनं धावत आहेत.
या महामार्गाने चालताना अनेकांना आपला जीव मुठीत घेऊन चालावे लागते. पोलीस आणि परिवहन विभागाच्या वतीने सुसाट वेगाने चालणाऱ्या वाहनांवर ठोस कारवाईसाठी एखादी मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.