मुंबई, 26 एप्रिल : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ उडवून देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना मोठा झटका बसला आहे. सर्वसामान्य, कष्टकरींची विधानसभेत बाजू मांडणारे लोकप्रतिनिधी म्हणून बच्चू कडू यांची ख्याती आहे. पण याच बच्चू कडूंविरोधात तपास करुन गुन्हे दाखल करण्याचे आदेश अकोला जिल्हा न्यायालयाने (Akola District Court) दिले आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. बच्चू कडू यांनी अकोला जिल्ह्यातील तीन रस्त्यांमध्ये 1 कोटी 95 लाखांच्या आर्थिक अनियमितता केल्याला आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. याच आरोपांप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आदेश दिला आहे. वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी जानेवारी महिन्यात अकोला पोलिसांकडे तक्रार केली होती. पण पोलिसांनी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने अकोला जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेही तक्रार केली होती. राज्यपालांनी तक्रार ऐकून योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले होते. वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी न्यायालयात पुरावे सादर केले होते. त्यानंतर आता अकोला जिल्हा न्यायालयाने 24 तासांच्या आत तपास करुन गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. ( नवनीत राणांनी डी गँगशी संबंधीत व्यक्तीकडून घेतले होते 80 लाख, संजय राऊतांचा पुराव्यासह गौप्यस्फोट ) दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी आणि बडे नेते सध्या ईडीच्या रडारवर आहेत. याशिवाय काही मंत्र्यांवर भ्रष्टाचारांच्या आरोपांखाली कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी अद्यापही जेलमध्येच आहेत. तर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे देखील सध्या जेलमध्ये आहेत. त्यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तीसोबत व्यवहार करत पैशांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. याशिवाय राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनादेखील काही दिवसांपूर्वी ईडीची नोटीस बजावण्यात आली होती. याशिवाय अनेक लोकप्रतिनिधींना ईडी चौकशीच्या ससोमिऱ्याला सामोरं जावं लागलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांच्या घरी ईडीने छापेमारी केली होती. या सगळ्या घटना वारंवार समोर येत असताना आता महाविकास आघाडीतील आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर बच्चू कडू नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.