बर्ड फ्ल्यूचा धोका, 'या' जिल्ह्यात चार ठिकाणी Alert Zone घोषित

बर्ड फ्ल्यूचा धोका, 'या' जिल्ह्यात चार ठिकाणी Alert Zone घोषित

प्रभावित क्षेत्रातील पोल्‍ट्रीफार्ममध्‍ये इतर कुठलेही पशु-पक्षी येणार नाही याची दक्षता घेण्‍यात यावी.

  • Share this:

अकोला, 20 जानेवारी : बर्ड फ्ल्यू (Bird Flu) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चार ठिकाणी मृत पक्षी आढळल्याच्या घटना निदर्शनास आल्यानंतर मृत पक्षांचे नमूने रोग अन्‍वेषण विभाग, पुणे यांच्या मार्फत राष्‍ट्रीय उच्‍च सुरक्षा पशुरोग संस्‍था, भोपाळ येथे पाठविण्‍यात आले आहेत. या नमुन्‍यांचा अहवाल प्राप्‍त होईपर्यंत संबंधित क्षेत्रास सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

घोषित केलेल्या सतर्क क्षेत्रात मौजे हातगांव ता. मुर्तिजापूर येथील राम हिंगणकर यांचे निवासस्‍थान, मौजे चाचोंडी ता. अकोला येथील डॉ. चिकटे यांचे पोल्ट्री फार्म, चोरवड ता. अकोट येथील बाळु पोटे यांचे पोल्ट्री फार्म व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निवास स्थान या क्षेत्रांचा समावेश आहे.

घोषित क्षेत्रापासूनचे 10 कि.मी. त्रिज्‍येमधील क्षेत्र सतर्क क्षेत्र ( Alert Zone) म्‍हणून घोषीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.

अलर्ट झोनबाबतच्या आदेशात नेमकं काय म्हटलं आहे?

या ठिकाणांपासून 10 कि.मी. त्रिज्‍येतील क्षेत्र सतर्क क्षेत्र ( Alert Zone) म्‍हणून जाहीर करण्‍यात आले आहे. या प्रभावित क्षेत्रातील परिसरामध्‍ये 2 टक्‍के सोडियम हायड्रोक्‍साईड किंवा पोटॅशियम परमॅगनेटने निर्जंतुकीकरण करावे. तसेच प्रभावित क्षेत्रातील पोल्‍ट्री फार्ममध्‍ये काम करणाऱ्या व्‍यक्‍तींनी चेहऱ्यावर मास्‍क लावणे तसेच हातामोजांचा वापर करणे अनिवार्य आहे.

वापरण्‍यात आलेल्‍या मास्‍क तसेच हातमोजांची योग्‍यप्रमाणे विल्‍हेवाट लावण्‍यात यावी. प्रभावित क्षेत्रातील पोल्‍ट्रीफार्ममध्‍ये इतर कुठलेही पशु-पक्षी येणार नाही याची दक्षता घेण्‍यात यावी. प्रभावित क्षेत्रातील पोल्‍ट्रीफार्ममधील पक्षांसंबंधीच्‍या आवश्‍यक त्‍या सर्व नेांदी अद्ययावत व व्‍यवस्थित ठेवण्‍यात याव्‍यात,असे आदेशात नमूद केले आहे.

या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता- 1860 च्या कलम 188 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व संबंधितावर कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था , संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यास याद्वारे प्राधिकृत करण्यात आले आहे, असंही जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशात म्हटलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 20, 2021, 9:15 PM IST

ताज्या बातम्या