अहमदनगर, 30 जानेवारी : नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. महाविकास आघाडीने या निवडणुकीसाठी शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्यानंतर भाजप सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार का याबाबत मोठी उत्सुकता होती. मात्र भाजपने शेवटपर्यंत आपली भूमिका जाहीर केली नाही. आज या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मात्र भाजपने जरी सत्यजित तांबे यांना अधिकृत पाठिंबा दिला नसला तरी देखील भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सत्यजित तांबे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याचं पहायला मिळत आहे. एवढंच नव्हे तर सत्यजित तांबे यांनी भाजपात प्रवेश करावा यासाठी आमचा आग्रह राहणार असंही विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले विखे पाटील?
सत्यजीत तांबे हे निश्चित विजयी होणार, अन्य उमेदवारांची चर्चा करण्याची आवश्यकता नाहीये, नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी सत्यजीत तांबेंसाठी मोठं काम केलं आहे. भाजपने त्यांच्यासाठी केलेल्या कामाचा सत्यजित तांबे सन्मान ठेवतील हा विश्वास आहे. सत्यजीत तांबे यांनी भाजपात प्रवेश करावा यासाठी आमचा आग्रह राहणार आहे, असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
थोरातांना टोला
दरम्यान यावेळी विखे पाटील यांनी बाळासाहेबत थोरात यांना देखील टोला लगावला आहे. मामाने पक्षाला मामा बनवल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही अजूनही काँग्रेसचे असून, आमच्या रक्तात काँग्रेस असल्याचं वक्तव्य सुधीर तांबे यांनी केलं होतं. यावर देखील विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुधीर तांबे हे काँग्रेसकडून तीनदा निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या रक्तात अजूनही थोडी काँग्रेस शिल्लक असेल. काँग्रेसचे रक्त कमी व्हायला अजून थोडा वेळ लागेल असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.