शिर्डी, 04 फेब्रुवारी: शिर्डी येथील साईबाबा मंदिर हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं तीर्थक्षेत्र मानलं जातं. याठिकाणी वर्षभरात कोट्यवधी भाविक साईदर्शनासाठी येतात. दर्शनाला आलेले भाविक सोन्या-चांदीसह, काही रोख रक्कम दान पेटीत टाकत असतात. याची मोजणी दर आठवड्याला केली जाते. पण नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदी झाल्यानंतर, भक्तांनी जुन्या नोटा दान पेटीत टाकू नये असं आवाहन साई ट्रस्टकडून करण्यात आलं होतं. असं असूनही अनेक भाविकांनी जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा दानपेटीत टाकल्या आहेत. त्यामुळे साई ट्रस्टची चिंता वाढताना दिसत आहे. दानपेटीत मिळणाऱ्या देणग्या या गुप्त देणग्या असतात. त्यावर ट्रस्टचं कसल्याही प्रकारचं नियंत्रण नसतं. त्यामुळे आतापर्यंत साई संस्थानाकडे सुमारे तीन कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. नोटाबंदी करून पाच वर्षे उलटल्यानंतर शिर्डीचं साई ट्रस्टनं जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी गृहमंत्रालयासोबतच भारतीय रिझर्व्ह बँकेशी पत्रव्यवहार केला आहे. याबाबत अधिक माहिती देताना साई संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सांगितलं कि, गेल्या चार महिन्यांपासून जुन्या नोटा बाजूला करण्याचं काम सुरू आहे. साईभक्तांनी श्रद्धेपोटी हे दान साई मंदिरातील दानपेटीत टाकलं आहे. याचा उपयोग साईभक्तांच्या सोयी-सुविधांसाठी आणि साई ट्रस्टच्या कामकाजासाठी व्हावा. या नोटा वापरातील नसल्यानं त्याचा वापर करता येत नाहीये. हेही वाचा- पदोन्नती मिळाल्यापासून ACB चे पोलीस निरीक्षक गायब; जालन्यात एकच खळबळ याबाबत गृह विभागाशी पत्रव्यवहार केला असता, त्याचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. गृह विभागानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी संपर्क साधण्यास सांगितलं आहे. त्यामुळे साई संस्थान आता आरबीआयकडे आपली अडचण मांडणार आहे. यातून निश्चितच सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा साई ट्रस्टकडून व्यक्त करण्यात आली आहे.
नोटाबंदीनंतर भाविकांनी कोट्यवधी रुपयांच्या जुन्या नोटा साई मंदिराच्या दानपेटीत टाकल्या आहेत. pic.twitter.com/9T8f9Rn51Z
— News18Lokmat (@News18lokmat) February 4, 2022
हेही वाचा- 7 वर्षांपूर्वी फुप्फुसात अडकली लवंग, नागपुरातल्या महिलेला डॉक्टरांनी दिलं जीवदान कोरोना विषाणूच्या साथीमुळे सध्या शिर्डीत भाविकांची संख्या कमी आहे. त्यामुळे दानपेटी आठवड्यातून एकदा उघडली जाते. मात्र कोरोना पूर्वकाळात आठवड्यातून दोनदा दानपेटी उघडली जात होती. सध्या कोट्यवधी रुपयांच्या जुन्या नोटा साई संस्थानाकडे पडून आहेत. ज्यांचा कोणत्याही प्रकारे वापर करता येत नाहीये. तसेच साई ट्रस्टच्या उच्चपदस्थांनी गेल्या पाच वर्षात काय केलं? असा सवाल आता उपस्थित होत आहे.