रिपोर्ट : सुनिल दवंगे अहमदनगर, 30 मे : दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला शनि जयंती (Shani Jayanti 2022) श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे साजरी केली जाते. या दिवशी शनी देवांचा जन्म झाला होता. विशेष म्हणजे शनी जयंती आणि सोमवती अमावस्या एकाच दिवशी आले आहे. त्यामुळे शनीदेवाची पूजा करून त्यांना प्रसन्न केले जाते. आज (सोमवार) होत असलेल्या शनि जन्मोत्सव उत्साहात अगदी भक्तीमय वातावरणात पार पडला आहे. शनिदेवाला आजच्या दिवशी सुवर्ण मुखवटा घातला गेला असून चौथरा आणि परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ज्योतिषशास्त्रात शनीदेवाला न्यायाधीश असे संबोधले जाते. याचा अर्थ असा, की व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार शनीदेव चांगल्या वाईट कर्माचे फळ देत असतात. शनी चालिसामध्ये शनीदेवाच्या वाहनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, शनीदेवाचे 7 वाहने आहेत. याशिवाय शनीदेवाच्या इतर काही वाहनांचाही शनी चालिसामध्ये उल्लेख आहे. यानिमीत्त जनकल्याण महायज्ञ सोहळा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 15 भाविकांनी काशीवरून मोटारसायकलवर कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने शनीदेवास जलाभिषेक घालण्यात आला. शनि जन्मोत्सवानिमित्त पहाटची महाआरती राकेश कुमार व महेश चंदानी यांच्या हस्ते तर दुपारी बारा वाजता सौरभ बोरा व जयेश शहा यांच्या हस्तेआरती करण्यात आली. शनि जयंती स्वयंसिद्ध मुहूर्त शनि जयंतीचा दिवस शनी संबंधित पूजा-अर्चना आणि उपाय करण्यासाठी एक स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो. या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी लाखो भक्तगण शनिशिंगणापुरात दाखल होतात. शनी देवाचे मनोभावे दर्शन घेवून तेल चढवले जाते. शनि जयंती दिनी भाविक करतात हे उपाय शनि जयंतीच्या दिवशी शनी चालीसेचे पठन केले जाते. ह्या पठणाने शनी देव प्रसन्न होतात. असं करणं भाविक फलदायी मानतात. शनि जयंतीच्या दिवशी दानाला विशेष महत्व आहे. यादिवशी गरजू लोकांना दान करणे, शनी जयंतीच्या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने लाभ प्राप्त होतो. यादिवशी हनुमानाच्या पूजेला विशेष महत्व आहे. हनुमानाची पूजा करणाऱ्या लोकांवर शनी देवाची वाईट दृष्टी पडत नाही अशी धारणा भाविकांची आहे. गंगाजलाने शनिदेवाला अभिषेक शनि जयंतीच्या दिवशी शनिशिंगणापूरातील भाविक कावडीचे काशी येथून गंगाजल आणले जाते. याच गंगाजलाने महापूजेच्या वेळी शनिला जलाभिषेक केला गेला. गंगेचे पाणी कावडीने पायी आणण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागतो. अलिकडे दुचाकीवरुन कावडीने हे गंगाजल आणले जाते. मंगळवारी शनिरत्न पुरस्काराचे वितरण उद्या मंगळवारी पद्मभुषण आदर्श सरपंच पोपटराव पवार व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते पुणे येथिल व्यावसायीक बी.व्यंकटेश राव यांना शनिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या चार पूजा साहित्यांवर बंदी शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टने भक्तांच्या लुटमारीस कारणीभूत ठरत असलेल्या पूजा साहित्यातील शनियंत्र, नवग्रह यंत्र, पादुका व चांदीसारखा दिसणारा शिक्का या चार वस्तू मंदिरात घेवून जाण्यास बंदी घातली आहे. शनैश्वर देवस्थान ट्रस्टने सर्व पूजा-साहित्य विक्रेत्यांना यंत्र बंदीबाबत सूचना दिली आहे. पुजेच्या ताटात या वस्तू दिसल्यास कारवाई करण्यात येईल, असे सुचित केले आहे. देवस्थानच्या ह्या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले असून आज शनि जयंती मोठ्या आनंदात साजरी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.